खड्ड्यानं घेतला कर्तव्यदक्ष पोलिसाचा जीव

मुंबई पोलीस दलातील कार्यक्षम पोलीस शिपायाचा एका खड्ड्यानं बळी घेतल्यानं समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. संतोष शिंदे (४२) असं त्यांचं नाव आहे. ते विलेपार्ले पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यात बाईक आदळून शिंदे यांचा अपघात झाला होता. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी सायन-पनवेल महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीची तसंच रोषणाईची जबाबदारी असणाऱ्या कंत्राटदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

असा झाला अपघात

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर ११ मध्ये राहणारे शिंदे ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणं ड्युटी संपल्यानंतर विलेपार्लेहून बाईकने घरी निघाले होते. सायन-पनवेल महामार्गावरून ते वाशी गावाजवळील सिग्नलच्या दिशेने निघाले. यावेळी रस्त्यावर एकही विजेचा दिवा सुरू नसल्यानं शिंदे यांची बाईक अचानक एका खड्ड्यात आदळली. हा झटका इतका जोरदार होता की बाईकवर बसलेले शिंदे एका क्षणात पुढे रस्त्यावर फेकले गेले आणि डोक्यावर आदळले. त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलेलं असूनही त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

त्यांना तात्काळ वाशीतील 'एमजीएम' रुग्णालयात दाखल करण्यातं आलं; पण सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादम्यान गुरुवारी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील तासगांव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. संतोष शिंदे यांच्या पश्चात पत्नी वैशाली (३८), मुलगा विघ्नेश (१३) आणि मुलगी सई (८) असं कुटुंब आहे.

ज्या ठिकाणी माझ्या भावाला अपघात झाला तिथं गेल्यावर आम्हाला त्या ठिकाणी अडीच फूट लांब, १ फूट रुंद आणि अर्धा फूट खोलीचा खड्डा दिसला. त्यानंतर आम्ही थेट वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. 

- राजेंद्र शिंदे, संतोष यांचे भाऊ

माझ्या पतीचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यामुळेच झाला आहे. हा रस्ता जर नीट असता, तर अपघात झालाच नसता. एका खड्ड्यानं माझा संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला आहे.

- वैशाली शिंदे, संतोष यांच्या पत्नी

उल्लेखनीय कामगिरी

संतोष शिंदे हे १९९६ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाले होते. विविध गुह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्यानं त्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते चारवेळा गौरविण्यात आले होते. तसंच त्यांना पोलीस आयुक्तांकडून इतर २० बक्षिसंही मिळाली होती. शिंदे यांनी एकूण १२८ पोलीस बक्षिसं पटकावली होती.

हे देखील वाचा -

अन् बाप्पांनीच जाता जाता बुजवले खड्डे !


डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या