पोलिस दलातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सुनील टोकेंवरच निलंबनाची कारवाई

वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे पोलिस हवालदार सुनील टोके यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस दलातील भ्रष्टाचाराबद्दल जनहित याचिका करणारे, वरिष्ठांकडून होणाऱ्या अन्यायालाय वाचा फोडणारे आणि पोलिसांच्या गैरकृत्याबाबत सोशल मीडियातून जाहिरपणे मत मांडणारे टोके यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. या पूर्वी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या यशश्री प्रमोद पाटील यांचे पती प्रमोद पाटील यांच्यावर देखील वरिष्ठ पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती.

भ्रष्टाचारावर बोट

वाहतूक विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि खालपासून वरपर्यंत विषवल्लीसारखी पसरलेली लाचखोरी सुनिल टोके या वरळीच्या बी. डी. डी चाळीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने उघडकीस आणायला सुरुवात केली आणि अवघ्या पोलिस दलात एकच हलकल्लोळ उडाला. पोलिस दलातील विविध गोष्टींमध्ये खरेदी-विक्री दरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचारावरही त्यांनी प्रकाश टाकला.

न्यायालयात आव्हान

एवढ्यावरच न थांबता न्यायालयात या सर्व प्रकरणांना आव्हान ही दिलं. टोके यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये लाच स्वीकारण्याचं दरपत्रक, टोके यांनी स्वतः केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ देखील होते. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी देखरेख ठेवावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

मंगळवारी रात्री ११.३० वाजता एक पीएसआय आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी घरी येऊन मला निलंबनाचं पत्र दिलं आहे. हे पत्र मी कामावर रूजू असताना देखील ते देऊ शकत होते. मी कुणी गुंड नाही. की अशा पद्धतीने मला कारवाईचं लेटर देण्यात आलं. मी फक्त पोलिस दलात सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतींविरोधात आवाज उठवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ज्याबाबत मी आवाज उठवला त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तसंच माझ्यावर करण्यात आलेल्या या कारवाईबाबत मी न्यायालयात धाव ही घेणार आहे.

- सुनील टोके, याचिकाकर्ते, पोलिस कर्मचारी


हेही वाचा-

वाहतूक पोलीस की हप्तेखोर?

ट्रॅफिक विभागात भ्रष्टाचार नाही - एसीबी


पुढील बातमी
इतर बातम्या