पुण्याच्या मंदीरात चोरी करणाऱ्यांचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

झवेरी बाजार येथे चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या आरोपीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपीने हे दागिने पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंदिरातून चोरल्याचा संशय आहे.

हेही वाचाः- बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

हिंगोली येथील हमालवाडीतील रहिवासी असलेला आरोपी अजय महावीर भुक्तार(१९) झवेरी बाजार परिसरात संशयीतरित्या फिरत असताना गस्तीवर असलेल्या पथकाला आढळून आला. पोलिसांनी त्याला धानजी स्ट्रीट येथे बोलावले. त्यावेळी त्याने पलायन केले असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत त्याच्याकडे दोन हार व हिरे सापडले. त्यावेळी दोन पंचाच्या मदतीने पंचनामा करून हे दागिने ताब्यात घेण्यात आले. त्याला या दागिन्यांबद्दल विचारले असता आरोपीने समाधानकारक उत्तर दिले नाही, अखेर त्याला याप्रकरणी सीआरपीसी कलम ४१(ड) अंतर्गत ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याची चौकशी केली असता आरोपीने पुण्यातील विश्राम बाग पोलिसांच्या हद्दीतील अखिल मंडई गणपती मंदिरातून चोरल्याचे सांगितले. त्यावेळी पुणे पोलिसांशी संपर्क साधला असता आरोपीने तेथून २२४ ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे समजले. पोलिसांना आरोपीकडे १४२ ग्रॅम दागिने सापडले आहेत. आरोपीला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

हेही वाचाः- बेरोजगारांसाठी खूशखबर, पोलीस दलात तब्बल १२ हजार पदांची भरती

गुरूवारी मध्यरात्री आरोपीने मंदिरातील सभा मंडपाकडे जाणा-या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मुर्तीवरील सुवर्ण हार, कठी व मंगळसूत्र चोरले होते. शुक्रवारी मंदिरातील पुजा-याने नेहमीसारखे मंदिर उघडले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या