पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

महाराष्ट्रात रविवारपासून गटारी अमावस्या सुरू होत असल्याने अनेकांनी गटारी साजरी कशी करायची याचे प्लानिंग सुरू केली आहे. सर्व सामान्यांप्रमाणेच पोलिसही दणक्यात गटारी साजरी करतात. मात्र यंदा पोलिस ठाण्यात गटारी साजरी करण्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत, गटारी साजरी न करण्याचे आदेश दिल्याची माहीत सूत्रांनी दिली आहे. तसेच प्रत्येक पोलिस उपायुक्तांना पोलिस ठाण्यांतील गटारी सेलिब्रेशनवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  

हेही वाचाः- Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

यंदा २१ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असून सोमवारी २० जुलैला आषाढी अमावास्या आहे. या दिवशी किंवा दोन-तीन दिवस आधी वार पाहून पोलिस ठाण्यांमध्ये गटारी साजरी केली जाते. पोलिस ठाण्यांबरोबरच विशेष शाखा, पोलिसांशी संबंधित इतर कार्यालयातही कोंबडी मटणाचे जेवण केले जाते. ही प्रथा बंद करावी, असे आदेश वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेले आहे. पोलिस दलाची जनमानसांत वेगळी प्रतिमा आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. प्राण्यांची पोलिस ठाण्यात कत्तल हे बेकायदेशीर कृत्य असून मुंबई महानगरपालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुॲल्टी टू ॲनिमल ॲक्ट १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा आहे. हा गुन्हा करू नका आणि प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- ‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद

अंधश्रद्धेला बळी पडू नका!

हत्या झालेली व्यक्ती, आत्महत्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळावी. यासाठी कोंबडी किंवा बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. आत्म्यांची बाधा होऊ नये, कामकाज सुरळीत चालावे म्हणून कोंबडी किंवा बोकडाचे मटण प्रसाद म्हणून वाटले जाते. ही केवळ अंधश्रद्धा असून यास बळी पडू नये किंवा ती वाढण्यास खतपाणी घालू नये, असे आदेश वरिष्ठ पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जमावबंदीचे पालन करण्याचे आदेश

यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे शहरात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच गर्दी न करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. गटारी निमित्त शहरात लागू असलेल्या कलम १४४ चे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच बेकायदा कत्तल खाने व प्राण्यांना मारणा-यांवर कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या