Advertisement

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद

शहरात ठिक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अशा मार्गांवरील वाहतूक पोलिसांनी बंद करून ती वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद
SHARES

मुंबईत मंगळवारपाठोपाठ  बुधवारीही सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर हवामान खात्याने दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना दिला आहे. सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अशा मार्गांवरील वाहतूक पोलिसांनी बंद करून ती वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

मुंबईत मागील २४ तासांत मुसळधार पावसाची सांताक्रूझ इथं ९७ मिमी आणि कुलाबा इथं १२२ मिमी नोंद झाली आहे. तसंच, पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाची नोंद होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकीला ब्रेक लागला आहे. मुंबईतल्या दादार टीटी, हिंदमाता परिसर, माहिम जंक्शन, एस.व्ही.रोड अंधेरी, खार सब वे, वांद्रे चांदीवली परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ही थांबवण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ही वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गावर वळवली असून पोलिसांनी या परिसरात न येण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचाः- मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

पाणी साचलेल्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी पालिकेने या परिसरात पंपही लावलेले आहेत. बुधवार आणि गुरूवारी मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते. रेल्वे आणि परिवहन सेवांनाही सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement