'लोन वूल्फ'वर मुंबई पोलिसांची करडी नजर!

'लोन वुल्फ'च्या दहशतीशी दोन हात करण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईतील ९३ पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांना या 'लोन वुल्फ'च्या पिशाच्यापासून सुटका करण्याबाबत एक परिपत्रकात काढले आहे. या परिपत्रकात 'लोन वुल्फ'ला ओळखण्यापासून ते त्याला निष्क्रिय करण्यासंबंधी उपाय देण्यात आले आहेत.

काय आहे लोन वुल्फ?

'लोन वुल्फ' हा एक असा दहशतवादी किंवा माथेफिरू असतो, जो एकटाच काम करतो. कोणतंही हिंसक कृत्य करायला त्याला कोणाच्या मदतीची किंवा आदेशाची गरज लागत नाही. हा लोन वुल्फ एखाद्या विचारसरणीला किंवा प्रक्षोभक भाषणांना, विचारांना बळी पडून ती विचारसरणी अंगीकृत करतो. हे 'लोन वुल्फ' एकटे काम करत असल्याने त्यांना ओळखणं हे जिकिरीचं होऊन जातं. 'लोन वुल्फ'चे हल्ले दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनेने कमी असले तरी त्यांचं प्रमाण वाढत चाललंय.

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. याआधी अनेक प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरूनच तरुणांचं ब्रेन वॉश करण्यात आलं होत. आपल्या या परिपत्रकात सोशल मीडियावर लक्ष ठेऊन अशा 'लोन वुल्फ'ना ओळखण्यास मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेऊन जे तरुण नैराश्य (frustration), रॅडिकल विचार, आत्महत्येच्या प्रवृत्ती तसेच हल्ला करण्याची वृत्ती असे संकेत देत आहेत त्यांना हेरून 'लोन वुल्फ'ची ओळख करता येऊ शकते, असा दावा या परिपत्रकात करण्यात आला आहे.

 

रॅडिकलाइझ झालेल्या तरुणांना मार्गावर आणण्यासाठी अशा तरुणांचं डीरॅडिकलाईझेशन करण्यासाठी सामान्य नागरिकांची मदत घेण्यात यावी, त्याचबरोबर अशा हल्लेखोरांच्या मागावर सुरक्षा यंत्रणा असल्याचा एक स्ट्राँग मेसेज जाणं देखील गरजेचं असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे. या वेळी सुरक्षारक्षकांना आणखीन सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या, तसेच अती महत्वाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, टायर किलर्स लावण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद व्हॅन आढळल्यास त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन किंवा अशा वहानांची चाके फोडून ते वाहन थांबवण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा 

'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?

या 'कोडवर्ड'ने संवाद साधते डी. कंपनी

पुढील बातमी
इतर बातम्या