थर्टी फर्स्टला ड्रंक अँड ड्राइव्हची संख्या घटली, ४५५ तळीरामांवर कारवाई

सरत्या वर्षाला निरोप देताना 'झिंगाट' होऊन वाहन चालवणाऱ्या मद्यपींची संख्या यंदा घटल्याचं समोर आलं आहे. ३१ डिसेंबरला वाहतुकीच्या नियमांसह ड्रंक ॲड ड्राइव्हवर पोलिसांची करडी नजर होती. त्यानुसार थर्टी फर्स्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत केलेल्या नाकाबंदीत पोलिसांना ९१२१ चालक सापडले. त्यात ४५५ जणांनी मद्यप्राशन केल्याचं निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

जनजागृतीचा परिणाम

नवीन वर्षाचं स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’ चालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांनी दिला होता. त्यासाठी पोलिसांकडून अगोदरपासूनच जनजागृती हाती घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा तळीराम चालकांची संख्या रोडावल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं.

बार मालकांना सूचना

ड्रंक अँड ड्राइव्ह रोखण्यासाठी यंदा वाहतूक पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली होती. पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात आला. बार, परमिट रूम, हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या तळीरामांना वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये किंवा त्यांना सहायक चालक द्यावा यासाठी सर्व बार मालक, परमिट रूम चालकांनाही सूचना करण्यात आल्या होत्या.

एक दिवस आधीपासूनच तयारी

पोलिसांनी ३० डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावून तपासणी सुरू केली. ३१ डिसेंबर सकाळच्या सत्रात ४४ मद्यपींना पकडल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. तर दुसऱ्या सत्रात पोलिसांनी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत एकूण ९१२१ वाहन चालकांवर वाहतूक नियम मोडल्याबद्दल कारवाई केली. त्यापैकी ४५५ चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत होते. त्यांचा वाहन परवाना ६ महिन्यांसाठी निलंबीत केला अाहे. तर भरघाव वेगात गाडी चालवणाऱ्या १११४ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली अाहे. 

पोलिस आणि राज्य सरकारने मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांविरोधात घेतलेल्या कठोर निर्णयामुळे हा आकडा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. मागच्या वर्षी ६१५ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली होती.


हेही वाचा-

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

फ्लॅशबॅक २०१८- ड्रग्ज तस्करांसाठी मुंबई 'गोल्डन ट्रँगल'


पुढील बातमी
इतर बातम्या