फ्लॅशबॅक २०१८- ड्रग्ज तस्करांसाठी मुंबई 'गोल्डन ट्रँगल'

मुंबईत सूर्य अस्ताला गेला की मोठमोठ्या हाॅटेलांत आणि पबमध्ये रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात तरुणाई अक्षरश: बेधूंद होऊन नाचत असते. पण या असंख्य दिव्यांच्या प्रकाशामागेही दडलेला असतो एक काळाकुट्ट अंधार आणि त्याच अंधारात चोरी-छुपे चालतो नशेचा बाजार.

फ्लॅशबॅक २०१८- ड्रग्ज तस्करांसाठी मुंबई 'गोल्डन ट्रँगल'
SHARES

एकेकाळी कष्टकऱ्यांची ओळख जपणारी मुंबई आता नाईट लाइफसाठी प्रसिद्धी झालीय. या नाईट लाइफमध्ये अंमली पदार्थांचं अंमल वाढू लागल्याने ड्रग्ज तस्करांसाठी तर मुंबई गोल्डन ट्रँगल बनलीय. अशियायी देश, दक्षिण अफ्रिका आणि युरोपातील देश भारतातल्या वाढत्या भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन देशभरात आपलं जाळ विणत आहेत.

त्याचं केंद्र मुंबई असल्याचं पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढं आलं आहे. अल्पावधीतच अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे लोक या धंद्याकडे ओढले जात आहेत. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. २७ डिसेंबर रोजी तब्बल १ हजार कोटी रुपयांचं फेन्टानील हे ड्रग्ज मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान पोलिसांनी हस्तगत केलं आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर १०० किलो वजनाचं हे ड्रग्ज मुंबईत आणण्यात आलं होतं. यावरून मुंबईला तस्करांनी कसा विळखा घातलाय हे स्पष्ट होतं.


पार्ट्यांमधून ड्रग्ज

मुंबईत सूर्य अस्ताला गेला की मोठमोठ्या हाॅटेलांत आणि पबमध्ये रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात तरुणाई अक्षरश: बेधूंद होऊन नाचत असते. पण या असंख्य दिव्यांच्या प्रकाशामागेही दडलेला असतो एक काळाकुट्ट अंधार आणि त्याच अंधारात चोरी-छुपे चालतो नशेचा बाजार. उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमधून केटामाईन, इफेड्रीन, इन्फेटामाईन, कोरींगा, बीगा, ट्रॉमा, हेरॉईन हे अंमली पदार्थ नशेबाजांना पुरवले जातात. या धंद्यातील उलाढाल अब्जावधी रुपयांच्या घरात आहे. मुंबईसह भारतात हा धंदा फोफावलाय. अमली पदार्थ तस्करांचं नेटवर्क थेट अमेरिका, कॅनडा, ब्रिटनपर्यंत जाऊन पोहोचलंय.


अमेरिकेतून कोकेन

२०१५ पर्यंत कोकेन, ब्राऊन शुगर, चरस या अंमली पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. साऊथ अमेरिकेतून अफ्रिकेतील एका मध्यस्थी टोळीच्या मदतीने कोकेन भारतात एअरपोर्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून आणलं जातं. हे अंमली पदार्थ नाकाने किंवा इंजेक्शनद्वारे घेतलं जातं. तर थायलंड, म्यानमार्क, लाओस येथील जंगलातून ब्राऊन शुगर किंवा हेराईन भारतात आणलं जातं. मात्र मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गाने हे अंमली पदार्थ जम्मू आणि पंजाबमार्गे मुंबईत येऊ लागले आहेत. तर चरस जम्मू, हरियाणा, राजस्थानमार्गे मुंबईत येत असल्याचं पोलिस कारवाईतून पुढं आलं आहे.


म्यॅव म्यॅव ड्रग्ज

बदलत्या काळाप्रमाणे नशेसाठी अंमली पदार्थांचा ट्रेंडही बदल आहे. सध्या भारतात ‘एमडी’ या अंमली पदार्थास मोठी मागणी आहे. अंमली पदार्थ आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एमडीसाठी तस्करांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. सहज आणि स्वस्त उपलब्ध होत असल्याने एमडीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या अंमली पदार्थाचं सेवन केल्याने डोळे मांजरीसारखे बारीक होतात. त्यामुळे त्याला ‘म्यॅव म्यॅव’ असंही म्हटलं जातं.


विद्यार्थ्याने बनवलं एमडी

शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थातून 'एमडी' बनवलं जातं. कर्नाटकमध्ये राजकुमार नायडू या सुशिक्षित विद्यार्थ्याने रासायनिक पदार्थातून अंमली पदार्थ बनवण्याचा ५ वेळा प्रयत्न केला. मात्र ६ व्या वेळी त्याला यश आलं. हे अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याने मुंबईच्या वडाळा परिसरातील भंगारवाल्यांकडून घेतल्याचं तपासात पुढं आलं होतं.

अफूपासून ड्रग्ज

शहरात कोकेन, एम्फेटामाइन, हेरॉईन, एलएसडी पेपर हे सर्वपरिचित पदार्थ. यातील अफूपासून गर्द, हेरॉईन तयार होते. मार्फिन हेसुद्धा अफूपासून तयार केलं जातं. कोकोच्या पानापासून कोकेन तयार केलं जातं. इतर अंमली पदार्थामध्ये मेथॅक्युलाॅन, अम्फेटामाईन, मेथअ‍ॅम्फेटामाईन आदींचा समावेश होतो. याशिवाय बटण गोळ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रायनॉक्सच्या गोळ्या, तसंच रेक्सकॉफ या खोकल्यावरील औषधाचा त्यात समावेश होतो.


नवी शक्कल

नशेसाठी ब्रेडला आयोडेक्स लावून खाण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. खोकल्याचं औषध अधिक प्रमाणात घेतलं जात होतं. मॅन्ड्रेक्सच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पादत्राणे चिटकविण्यासाठी वापरला जाणारा घट्ट द्रव पदार्थ, थीनर, व्हाईटनर आदींचाही नशेसाठी वापर केला जात आहे. साखरेची भुकटी चांदीसारखा वर्ख असलेल्या कागदावर ठेवून त्याखालून आगपेटीच्या काडीने जाळायची व त्याचा वास घ्यायचा. कमी बजेट असणाऱ्यांनी ही नवी शक्कल शोधली आहे.


सांकेतिक शब्द

'एलएसडी' पेपर हा अंमली पदार्थाचा आणखी एक प्रकार आहे. ४० 'एलएसडी' पेपर हे ९० हजार रुपयांना मिळतात. मुंबईत कांदिवली येथे नुकतंच पाच ५ महाविद्यालयीन तरुणाला 'एलएसडी' पेपर बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत झालेली ही एकमेव मोठी कारवाई आहे. ऑनलाइन मिळणारे अंमली पदार्थ ही मुंबई पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. सांकेतिक भाषेत त्याचे व्यवहार चालतात. त्यासाठी प्रत्येक अंमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी कोक, गांजासाठी वीड, हशीशसाठी हसत, एमडीसाठी बुक किंवा म्यॅव म्यॅव या सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात येतो.


इंटरनेटवर जाहिरात

पोलिसांनी या नशेची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळल्यानंतर या तस्करांनी इंटरनेटवर चुकीच्या पद्धतीने जाहिरात करून नशेची विक्री करण्यास सुरूवात केली. पिळदार शरीरयष्टीसाठी तरुणात असलेल्या क्रेझचा फायदा घेऊन घातक परदेशी उत्तेजक औषधांची (अंमली पदार्थांची) विक्री सध्या मुंबईत जोरात सुरू आहे. सुंदर व सळपातळ शरीरयष्टी कुणाचंही लक्ष वेधून घेते. नाजूक कंबर आणि सपाट पोटासाठी म्हणूनच महिलावर्गात शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. केवळ तरुणाईच नाही तर वय झालेल्यांनाही शरीरयष्टी सुंदर आणि आकर्षक करण्याचं वेड लागलं असल्याचं सगळीकडेच पहायला मिळतं. सर्वसामान्यांमधील या बदलत्या विचारसरणीचा फायदा तस्कर घेऊ लागले आहेत.


औषध म्हणून ड्रग्ज

परदेशी औषध किंवा आयुर्वेदीक औषधांच्या नावाखाली तस्कर गल्लोगल्ली अंमली पदार्थांची तस्करी करू लागले आहेत. विशेष म्हणजे अशा भंपक गोष्टींना नागरिकही बळी पडताना दिसत आहेत. कुणाला अल्पावधीतच पिळदार शरीरासाठी, कुणाला बारीक होण्यासाठी, कुणाला सेक्स ताकद वाढवण्यासाठी तर कुणाला मानसिक तणावातून किंवा लक्ष केंद्रीत करण्याच्या नावाखाली तस्कर या अंमली पदार्थांची विक्री औषध म्हणून करत आहेत. नुकतीच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी डोंगरीतून एका मोठ्या तस्कराला अटक केली. या तस्कराच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आहे.


सायबर पोलिसांची मदत

माणसाला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या मादक पदार्थांची यादी आणि त्यामधील नफा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रासायनिक किंवा आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अंमली पदार्थांचे तस्कर तरुण आणि गरजूंना आपल्या विळख्यात ओढत असल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत पुढे आली आहे. हे रोखण्यासाठी अंमली पदार्थविरोधी शाखेचे पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत.

 

शहरातील अंमली तस्करांची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ५ युनिट कार्यरत आहेत. अंमली पदार्थविरोधी पथकाने सरत्या वर्षात तब्बल १०४० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केलं आहे. मात्र, ड्रग्जविरोधातील या लढाईत नागरिकांची मदतही देखील तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे आजूबाजूला अशा तस्करांची माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करा.
- शिवदीप लांडे, पोलिस उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी पथक


कुठं तक्रार कराल?

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नार्को इन्फोलाइन ९८१९१११२२२ ही नवीन हेल्पलाईन नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या नंबरवर परिसरातील अंमली पदार्थाविषयी नागरिक तक्रार नोंदवू शकतात. ही हेल्पलाईन नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहे.


ड्रग्जगुन्हेजप्तकिंमत (रू)
फेन्टानील
१०० किलो१ हजार कोटी रुपये
हेराॅईन२०८ किलो७ कोटी ७२ लाख ६९ हजार
चरस१०६ किलो २ लाख ३८ हजार
कोकेन१७१ किलो१ कोटी २८ लाख १९ हजार
गांजा१२८७५ किलो२ कोटी १ लाख १४ हजार
एमडी३५९५ किलो३ कोटी ६१ लाख ४० हजार


संबंधित विषय