अर्णब गोस्वामीचा तुरूंगातील मुक्काम वाढला

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना शनिवारी देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुटकेचा दिलासा मिळू शकला नाही. यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याकडून करण्यात आलेल्या अंतरिम सुटकेच्या दिलासा विषयीच्या अर्जावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत अर्णब यांच्यावर केवळ कुहेतूने कारवाई करण्यात येत असल्याने आरोपीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे आरोपीच्या सुटकेचा अंतरिम दिलासा देणारा आदेश करावा. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी लागेल आणि अर्णब यांना जामीन मिळू शकणार नाही, याची सरकारला जाणीव होती. त्यामुळेच त्यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली, असा युक्तीवाद अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला. 

त्यावर हरीश साळवे यांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. सुटकेचा अंतरिम दिलासा देण्याच्या अर्जावर निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगीही घ्यावी लागेल. तरीही लवकरात लवकर जाहीर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 

आरोपींना कलम ४३९ अन्वये जामिनासाठी अर्ज करण्यासाठी अन्य पर्याय देखील उपलब्ध आहेत. या याचिकांचा त्यात कोणताही अडथळा नसेल. त्यामुळे संबंधित न्यायालय कायद्याप्रमाणे योग्य तो आदेश करू शकेल. अर्ज केल्यास संबंधित न्यायालयाने ४ दिवसांच्या आत योग्य तो निर्णय द्यावा, असा आदेश देत न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला.

(no bail relief for republic tv editor arnab goswami)


हेही वाचा -

अर्णब गोस्वामींविरूद्ध दुसरा हक्कभंग?

अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं


पुढील बातमी
इतर बातम्या