‘घातक’ तात्या पटेल अखेर अटकेत

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मिरा-भाईंदर शहरात ५० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या अशरफ पटेल उर्फ तात्या गुलाम रसुल पटेल याला गुरूवारी काशिमीरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भाईंदरच्या एका जमिनीच्या वादामध्ये तात्याने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्याला मकोका लागला होता. याच प्रकरणात तात्या गेल्या दीड वर्षांपासून फरार होता.

घातक सिनेमाचा खरा 'हिरो'

१९९६ साली प्रदर्शित झालेला सनी देओलचा ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमात तात्याची भूमिका ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंग्जोपा यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला होता. अर्धशतकाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या तात्या पटेलने परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. हत्या, हत्येचा प्रयत्न, बोगस कागदपत्राद्वारे धमकी देऊन जमिनींवर जबरदस्ती कब्जा, खंडणी, बेकायदा शस्त्रे बाळगणं आदी ५० हून अधिक गंभीर गुन्हे तात्याच्या नावावर दाखल आहेत.

कुठल्या प्रकरणात अटक?

सप्टेंबर २०१७ मध्ये काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाटकेश परिसरात राहणाऱ्या नझमा शकील अहमद पटेल या महिलेची जमीन बळकावण्याच्या वादातून तात्याने तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर काशिमीरा पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी त्याने आपल्या अंगरक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर तो ४ वर्षे फरार झाला होता. तात्याची ही वाढती दहशत रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर मकोका लावला होता.

घरातील प्रत्येक सदस्यावर गुन्हा

तात्यासोबत त्याच्या घरातील प्रत्येक सदस्यावर विविध गुन्ह्यांनी नोंद आहे. या तात्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर गोरेगाव आणि अंधेरी परिसरातील यारीरोड येथे तात्या वास्तव्यास असल्याची माहिती काशिमीरा गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिस उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पोलिसांनी सापळा रचून त्याला गुरूवारी सकाळी अटक केली.


हेही वाचा-

१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' पोलिस कोठडीत

निलंबित पोलिस शिपायानेच चोरली काडतुसे


 

पुढील बातमी
इतर बातम्या