दोन शास्त्रज्ञांना भामट्यांनी घातला ऑनलाइन गंडा

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची फसवणूक केली आहे. पवईतील एका शास्त्रज्ञाला फेसबुकवरील मैत्रिणीने साडेतीन लाखांचा तर वांद्रे येथील शास्त्रज्ञाला घरातील सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने ५८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

पवई येथील ६७ वर्षीय निवृत्त शास्त्रज्ञाला फेसबुकवर रोझी मॉर्गन नावाच्या महिलेने रिक्वेस्ट पाठवली होती. ती त्यांनी स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाल्यावर एकमेकांनी मोबाइल नंबर शेअर केले. ते रोज चॅटिंगही करत असत. तिने आपण औषध कंपनीत कामाला असल्याचं सांगितलं होतं. तिची कंपनी ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधून पाच हजार डॉलरमध्ये औषध तेल खरेदी करते. ते तेल नवी दिल्लीतील डॉ. वीरेंद्र शर्मा  २५०० डॉलरने विकतात. त्यामुळे ते तेल शर्मा यांच्याकडून घेऊन दुप्पट दरात माझ्या कंपनीला विकून फायदा मिळवू शकता. नफ्यातील ७० टक्के वाटा तुम्हाला मिळेल, असं रोझीने या शास्त्रज्ञाला सांगितलं.

शास्त्रज्ञाने तिने दिलेल्या नंबरवर फोन करून तेल खरेदी करण्याची तयारी दर्शवून ॲडव्हान्स म्हणून साडेतीन लाख रुपयेही भरले. मात्र, त्यानंतर त्यांना तेल मिळाले नाही. रोझीचाही मोबाइल नंबर बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.

संरक्षण दलातील वांद्रे येथे राहणाऱ्या एका शास्त्रज्ञाने जुन्या घरातील सामान नवीन घरी नेण्यासाठी गुगलवर मूव्हर्स अँड पॅकर्सचा शोध घेतला. त्यावरून त्यांनी एका कंपनीच्या क्रमांकावर संपर्क केला. कंपनीचे दोन प्रतिनिधी त्यांच्या वांद्रे येथील घरी आले. त्यांनी सामान हलवण्याचे ७९ हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं. मात्र, घरात वरिष्ठ नागरिक असल्यास सवलत देऊन ५९ हजार रुपयांमध्ये सामान हलवू असं सांगितलं. मात्र, पैसे रोख देण्यास सांगितले. त्यानुसार शास्त्रज्ञाने ५९ हजार रुपये दिले आणि सामान नेण्यासाठी दिवस ठरवला. मात्र, त्या दिवशी ते दोघे आलेच नाही. त्यामुळे शास्त्रज्ञाने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली. 


हेही वाचा- 

देशात वर्षभरात ७४५९ प्राण्यांची तस्करी

लोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत?


पुढील बातमी
इतर बातम्या