महिला प्रवाशांनो सावधान! रेल्वे स्थानकावर होतोय केमिकल हल्ला, एकाला अटक

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनो सावधान! तुम्ही अंधेरी मेट्रो स्थानक ते अंधेरी रेल्वे स्थानक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात केमिकल हल्ला होत असून अनेक महिला प्रवाशांच्या पायांवर केमिकल टाकलं जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांच्या निर्भया पथकानं केमिकल हल्ला करणाऱ्या एकाला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना आता घाबरण्याची गरज नाही. पण असा केमिकल हल्लेखोर अजूनही असू शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे आणि म्हणूनच महिला प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

सुरक्षेचा प्रश्न एरेणीवर

रेल्वेनं प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच एेरणीवर असतो. महिलांच्या डब्ब्यात गर्दुले, विकृत शिरण्यापासून महिला प्रवाशांशी अश्लील वर्तन करणं, हस्तमैथून करणं आणि विनयभंगासारख्या अनेक तक्रारी सातत्यानं समोर येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भूज एक्सप्रेसमध्ये एका महिलेची हत्याही झाली होती. त्यामुळे महिला प्रवाशांना नेहमीच जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. असं असताना आता महिला प्रवाशांची डोकेदुखी आणि चिंता आणखी वाढवली आहे ती या केमिकल हल्ल्यांनी आणि केमिकल हल्लेखोरांनी.

अशी आली घटना उघडकीस

गुरूवारी एका तरूणीनं अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असता ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही तरूणी सकाळी अंधेरी मेट्रो स्थानकातून अंधेरी रेल्वे स्थानकाकडे जात असताना तिच्या पायावर अचानक जळजळ सुरू झाली. त्यानंतर तिला आपल्या पायांवर कुणी तरी केमिकल फेकल्याचं लक्षात आलं नि तिने तात्काळ घर गाठलं. तिने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी अंधेरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर आणखी एका तरूणीनं अशीच तक्रार दाखल केल्यानं या परिसरात केमिकल हल्ला होत असल्याचं स्पष्ट झालं आणि मग कुठे लोहमार्ग पोलिस आणि निर्भया पथक कामाला लागले.

हल्लेखोर अटकेत

काही तासांतच निर्भया पथकानं केमिकल हल्ला करणाऱ्या एकाला अंधेरी परिसरातून अटक केली आहे. साध्या वेशात पोलिसांनी गस्त घालत या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या हल्लेखोराचं नाव अद्याप समजू शकलेलं नसून तो विकृत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तंग आणि तोकडे कपडे घालणाऱ्या महिला प्रवाशांनाच हा विकृत हल्लेखोर लक्ष्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान अंधेरी रेल्वे स्थानक ते अंधेरी मेट्रो स्थानक यादरम्यान गर्दीत महिला प्रवाशांच्या पायावर केमिकल टाकलं जातं. केमिकल टाकल्याचं लक्षात येईपर्यंत, पायाची जळजळ सुरू होईपर्यंत हल्लेखोर गर्दीचा फायदा घेत पळ काढतात. त्यामुळेच पोलिसांनी या परिसरात करडी नजर ठेवत अखेर एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र अजूनही असे हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना काळजी घेण्याची गरज आहे.


हेही वाचा -

सावधान! जस्ट डाईलवर नंबर शोधणं 'असं' पडू शकतं महागात

ड्रग्ज तस्करी प्रकरणी विशेष मोहिमेंतर्गत ७ जणांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या