लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाची पार्टी, भाजप नगरसेवकाला अटक

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. लोकांनी गर्दी करू नये, तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवावं असं आवाहन वारंवार सरकारकडून केलं जात आहे. मात्र, आता लोकप्रतिनिधीनेच सरकारने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवले आहेत.  लॉकडाऊनचं उल्लंघन करून मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भाजपाच्या पनवेल पालिकेचा नगरसेवक व इतर 10 जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात पनवेल पोलिसांनी कारवाई केली आहे. वाढदिवसानिमित्त नगरसेवक बहिरा हे त्यांच्या तक्का येथील घरातील छतावर गावातील दहा मित्रांसोबत शुक्रवारी रात्री पार्टी करत होते. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका नागरिकाने याबाबत माहिती दिली. त्यानंतर रात्री 12 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले दहा मित्र व नगरसेवक बहिरा आढळून आले. तेथील दारुची बाटलीही पोलिसांनी जप्त केली आहे.

याप्रकरणी  नगरसेवक बहिरा व अन्य 10 जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत. बहिरा याचं नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांना याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार असून ते काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा

वाधवान प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकचा मदतीचा हात


पुढील बातमी
इतर बातम्या