आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणाचा तपशील द्या, न्यायालयाचे निर्देश

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात ५ एप्रिल रोजी एका अभियंत्याला झालेल्या कथित मारहाण प्रकरणाच्या तपासाचा सर्व तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी न्या. सी. व्ही. भडंग यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डस ठाण्यातील दंडाधिकारी न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात जमा केल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अॅड. दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला दिली. त्यावर हा  तपशील उच्च न्यायालयातही सादर करण्याचे तोंडी निर्देश न्यायमूर्तींनी दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मे रोजी होणार आहे.

हेही वाचा - गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड रुग्णालयात

कुणाची याचिका?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन झालेल्या मारहाण प्रकरणात आव्हाड यांना आरोपी करावं तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी याचिकाकर्ता आणि स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून केली आहे.   

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे प्रज्‍वलित करण्‍याचं आवाहन देशवासीयांना उद्देशून केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांच्या भूमिकेवर सोशल मीडियावरून टीका केली होती. त्यानंतर मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली  इथं राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा प्रश्न त्यांनी आव्हाड यांना विचारला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केलं होतं. 

बेदम मारहाण

यानंतर करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असं सांगून घरातून बाहेर बोलवलं आणि आव्‍हाड यांच्‍या विवियाना मॉल शेजारील बंगल्‍यावर नेत आव्हाड यांच्या उपस्थितीत २० ते २५ गुंडांनी बेदम मारहाण केली असा आरोप करमुसे यांनी केला आहे. त्यानंतर करमुसे यांच्या तक्रारीवरून वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हेही वाचा - अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश

आव्हाडांचा खुलासा 

त्यावरही आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या तरुणाने माझ्या देखत, माझ्या माणसांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तरूणाला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला, असं ते म्हणाले होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या