समाज माध्यमांवर बदनामी करण्याची भीती दाखवून महिलेकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उल्हास नगर येथून एकाला अटक केली. आरोपीने पीडित महिलेकडे आतापर्यंत २३ हजार रुपये स्वीकारले होते.
हेही वाचाः माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही
तक्रारदार महिला २०१२ मध्ये सरोगसी केअर सेंटरमध्ये काळजी वाहक म्हणून कामाला होत्या. त्यावेळी एका मुस्कान नावाच्या महिलेची माहिती एका जोडप्याला दिली होती. त्यांनी मुस्कान मार्फत बाळाला जन्म देण्याचे ठरवले. त्याबाबत त्यांच्यात कंत्राटही झाले. पण पुढे ते कंत्राट रद्द झाल्याचे तक्रारदार महिलेला कळाले. त्यानंतर २०२० मध्ये एका व्यक्तीचा दुरध्वनी आला त्याने महिलेला आपण मुस्कानचा मित्र असल्याचे सांगून तुझ्यामुळे मुस्कानचे कंत्राट रद्द झाले. त्यामुळे कंत्राटाच्या बदल्यात पाच लाख रुपये तू दिले नाहीस, तर तुझी समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर आरोपीने महिलेच्या विविध नावाने फेसबुक प्रोफाईल तयार करून तक्रारदार महिला व तिच्या कुटुंबियांबद्दल बदनामीकारक मजकूर अपलोड केला.
हेही वाचाः- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे
त्यानंतर फेसबुक व वॉट्सअॅपवरून त्याने अश्लील फोटो पाठवणे सुरूच ठेवले. अखेर महिलेने कंटाळून आरोपीला २३ हजार रुपये दिले. पण त्यानंतरही आरोपीने बदनामी करणे सुरू ठेवले. अखेर महिलेने याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-४ चे प्रभारी पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून उल्हास नगर येथून आरोपीला अटक केली. आरोपी राजस्थान येथे पळण्याच्या तयारीत होता. आरोपीला माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे