व्यापारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी सेल्समनला अटक

मुलुंडमध्ये सकाळी जाँगिग करत असलेल्या व्यापारी महिलेची छेड काढून पळ काढणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रेहमान शेख(२७) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुलुंड परिसरात राहणारी ३१ वर्षीय महिला १३ डिसेंबर रोजी मुलुंडच्या सरदार तारासिंग तलाव येथील पार्कात जाॅगिंग करत होती. त्यावेळी दुचाकीहून आलेल्या अब्दुलने पीडित महिलेला मागे चुकीच्या अर्थाने स्पर्श करून पळ काढला. त्यावेळी महिलेने टॅक्सीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मात्र अब्दुल तिच्या हाती आला नाही. घडलेल्या प्रकाराची माहिती तिने नवघर पोलिसांना देत गुन्हा नोंदवला.

या गुन्ह्याचा तपास नवघर पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी आनंदनगर टोलनाका येथील सीसीटिव्ही स्पष्ट दिसून आला. त्याच्या दुचाकीवरील नंबरच्या मदतीने पोलिसांनी त्याला कुर्ला पश्चिम येथून अटक केली. अब्दुल हा सेल्समन म्हणून काम करत असून त्याने हे कृत्य का केले हे अद्याप सांगितलेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा  -

मालाड भिंत दुर्घटना प्रकरण: कोणीही दोषी नाही

धक्कादायक! मुंबईत १० वर्षात वाढली तब्बल 'इतकी' वाहनं


पुढील बातमी
इतर बातम्या