रोजच्या वाहतूककोंडीने मुंबईकर हैराण झाला आहे. ही वाहतूककोंडी कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाही. मुंबईत प्रचंड वाढत असलेल्या वाहनांमुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढतच आहे. आता वाहनांच्या संख्येबाबतची १० वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
मुंबईत मागील १० वर्षात म्हणजेच २००९ ते २०१९ या कालावधीत वाहनांच्या संख्येत तब्बल १०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढली असली तरी रस्ते मात्र तेवढेच आहेत. गेल्या १० वर्षांत रस्ते आहे तितकेच म्हणजे २ हजार किलोमीटर इतकेच राहिले आहेत. त्यामुळे भविष्यातही मुंबईकरांची या वाहनकोंडीपासून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, ध्वनी आणि वायू प्रदूषण या समस्या वाढतच आहेत.
मुंबईत सध्या तब्बल २२ लाख दुचाकी आहेत. म्हणजे एक किलोमीटर अंतरावर तब्बल १,१०० दुचाकी धावतात. तर चारचाकी वाहनांची संख्या १०.६ लाख इतकी आहे. २००९-१० या काळात मुंबईत केवळ ५.१ लाख चारचाकी वाहनांची नोंद होती. म्हणजेच गेल्या दहा वर्षात चारचाकी वाहनांची संख्याही दुपटीनं वाढली आहे. २५ ते ३० वयोगटातील ग्राहकांची खरेदीची वाढती क्षमता, वाहनांच्या किमतीतील घट आणि सहज मिळणारं कर्ज ही देखील वाहनांच्या वाढत्या संख्येची कारणं आहेत.
हेही वाचा -
बोरीवली स्थानकात थांबणार तेजस एक्स्प्रेस
...म्हणून बेस्टला सहन करावा लागतोय आर्थिक तोटा