मुलीच्या उपचारासाठी 'ती' बनली तस्कर; १६ वेळा परदेशात तस्करी

शहरातून अंमली पदार्थ तस्करांना हद्दपार करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली असताना तस्करांनी आता अंमली पदार्थ पोचवण्यासाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आखाती देशात अंमली पदार्थ नेहणाऱ्या एका शबाना बेगमने (४०) या महिलेला अटक केली. मुलीला असलेल्या दुर्धर आजारासाठी पैसे नसल्यामुळे शबानाने तब्बल १७ वेळा जीव धोक्यात घालून अंमली पदार्थांची तस्करी केल्याचं चौकशीत उघडकीस झालं आहे.

आखाती देशात पाठवायचे

मूळची हैद्राबादची रहिवाशी असलेल्या शबाना बेगम हिला१६ वर्षांची मुलगी आहे. कित्येक वर्षानंतर झालेल्या या मुलीवर ती जिवापाड प्रेम करायची. जन्मानंतरच मुलीला दुर्धर आजार झाल्याचं शबानाला समजलं.  त्यासाठी लागणारा वैद्यकीय खर्चही मोठा होता. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी होती. अशातूनच ती अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात आली. शबानाच्या मजबुरीचा फायदा घेऊन हे तस्करी तिला आखाती देशात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाठवायचे.

२.५ किलो चरस 

आखाती देशात आता थंडी पडण्यास सुरूवात होत असल्याने त्या ठिकाणी चरस या अंमली पदार्थाची मोठी मागणी असते. भारताच्या तुलनेत तिकडे अंमली पदार्थांसाठी मोेठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. मुलीवरील उपचारासाठी शबाना तस्करीसाठी तयार झाली. आतापर्यंत ती १६ वेळा परदेशात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी गेली होती. १७ व्या वेळी ती चरसच्या तस्करीसाठी हैद्राबादहून मुंबईला आली होती. मुंबईतून ती शारजा येथे आखाती देशात जाणार होती. मात्र, याची कुणकुण केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाला लागल्यानंतर शनिवारी शबानाला रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून २.५ किलो चरस हस्तगत केलं आहे.

अाधीही महिला ताब्यात

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मुंबई पोलिस अंमली पदार्थ विरोधी पथकाने विमानतळाहून शेख फुरकाना खातून या महिलेला अटक केली होती. शबाना ही त्याच रॅकेटमधील असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.  या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त


पुढील बातमी
इतर बातम्या