SHARE

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीची ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. जप्त करण्यात आलेली संपत्ती ही पीएनबीच्या घोटाळ्यातील पैशांतून खरेदी केल्याने ईडीने कारवाई केल्याचं बोललं जात आहे. ईडीने ही कारवाई मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आणि सिंगापूर या देशांत केली आहे.


हजारो कोटींचं दिलं कर्ज

देशातील १२२ वर्ष जुन्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि प्रसिद्ध डायमंड किंग नीरव मोदीने खोटे हमीपत्र सादर करून परदेशातील मित्रांना व्यवसायासाठी हजारो कोटींचं कर्ज मिळवून दिलं. डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिल्याचा आरोप आहे.


घोटाळा उघडकीस आल्यानंतर...

गीतांजली जेम्स - जिली इंडिया आणि नक्षत्र, तसंच नीरव मोदी ग्रुप फर्म्स यांच्या वतीने एलओयू (lou) किंवा एफएलसी (FLC- फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट)च्या आधारे अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेकडून कर्ज देण्यात आलं. यातील एकही व्यवहार हा कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)च्या माध्यमातून झाला नव्हता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेकडून गुन्हा नोंदवण्यात आला होता.


देशभरातील ९ मालमत्तांवर छापे

याप्रकरणी ईडीने निरवच्या देशभरातील ९ मालमत्तांवर छापे टाकत, देशांतर्गत ५ हजार १०० कोटींची मालमत्ता जप्त केली. मात्र या घोटाळ्यातील सर्वाधिक पैसा हा देशाबाहेर गुंतवण्यात आला होता. त्यामुळे नीरवच्या परदेशातील संपत्तीवर टाच आणण्यास ईडीने सुरुवात केली. दरम्यान देशाबाहेरील निरव मोदीची संपत्तीवर ईडी जप्ती आणत ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती आतापर्यंत ईडीने जप्त केल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या