गुन्हे शाखेच्या सहा पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोनाविरुद्ध लढण्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस उभे आहेत. अपुरे मनुष्यबळ, कटेंन्मेंट झोन मधील बंदोबस्त, २४ तास सेवा आणि वाढणारे रुग्ण... सभोवताली परिस्थिती गंभीर असूनही मुंबई पोलिस स्वत: चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात आल्यामुळेच मुंबईच्या गुन्हे शाखेतील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ११ जणांना क्वारनटाईन करण्यात आले आहे.  

हेही वाचाः- Reduce height of ganesh idols: यंदा गणेशमूर्ती लहानच ठेवा, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

मुंबई गुन्हे शाखेतील सहा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची अतिसौम्य लक्षणे सुरूवातीला दिसून आली. त्यानंतर वरिष्ठांच्या गाडीवर असलेल्या चालकाचा १७ जून रोजी वैद्यकिय अहवाल देखील कोरोना पाझिटिव्ह आल्यानंतर गुन्हे शाखेतील त्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह इतर ११ जणांना होम क्वारनटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर या कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सहा जणांना कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. १९ जूनला हे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील पोलिस अधिकारा-यावर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात, तर पाच पोलिसांवर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्या चालकावर वांद्रे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः- सोशल मिडिया आणि व्हाँट्स अँपवरचे मेसेज पुढे पाठवताना घ्या काळजी

दरम्यान मुंबईत आतापर्यंत २३९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १६६७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या पोलिसांचा आकडे ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील ७२२ जण कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले आहे. २८२ पोलिस उपचारानंतर सध्या घरी आहेत, तर ६६३ पोलिस लवकरच कर्तव्यावर रूजू होणार आहेत.   मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये ४५२ पोलिस  उपचार घेत आहेत. तर २०५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय ३५ पोलिसांना विलगीकरणार ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत ८२ राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पाच अधिकारी व ७७ जवानांचा समावेश आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या