धाडसी महिलेनं पाठलाग करून चोराला पकडलं

रस्त्यावरील गाफील नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या चोराला एका धाडसी महिलेनं पाठलाग करून पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. नरेश परमार (१९) असं या चोराचं नाव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून परमारच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

रिक्षाद्वारे केला पाठलाग

मालाड परिसरात समाजसेविकेचं काम करणाऱ्या रंजना काळे या बुधवारी मुलुंडच्या भक्ती मार्गावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी एक डाॅक्टर रस्त्यावरून फोनवर बोलत निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरू मागून आलेल्या परमार आणि त्याच्या साथीदारानं डाॅक्टरांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. हा प्रकार पाहून रंजना काळे चोरांमागे धावल्या. मात्र चोर दूर पळून गेले होते. त्यावेळी काळे यांनी एका रिक्षावाल्याच्या मदतीनं चोरांचा पाठलाग केला. एक महिला अापला पाठलाग करत असल्याची कुणकुणही आरोपींना लागली नाही.

बारावीला किती टक्के पडले?

काही अंतरावर गेल्यानंतर दोन्ही आरोपी एका दुकानाजवळ थांबले. त्यावेळी एक आरोपी काहीतरी घेण्यासाठी दुकानात गेला होता. तर परमार चोरी केलेला मोबाइल पाहत होता. त्यावेळी रिक्षातून पाठलाग करत आलेल्या रंजना परमारजवळ येऊन थांबल्या. परमार पळून जाऊ नये म्हणून तुला बारावीला किती टक्के पडले, असे विचारत त्याला बोलण्यात गुंतवले. परमारच्या काहीही लक्षात आले नाही.

चोराची काॅलर पकडली

काळे परमारच्या जवळ जाताच त्यांनी त्याची काॅलर पकडली. त्यावेळी घाबरलेल्या परमारनं हातातील मोबाइल टाकून रंजना यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पळ काढला. मात्र पुढे जाऊन त्यांनी परमारला पकडून चांगलाच चोप दिला अाणि मुलुंड पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी परमारवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. काळे यांच्या या धाडसी वृत्तीनं परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


हेही वाचा -

सलमान खानला भेटण्यासाठी गाठली मुंबई

पोलिसांच्या घरफोडीचा प्रयत्न अंगलट

पुढील बातमी
इतर बातम्या