चोरीच्या दुचाकी ओएलएक्सवर विकणारा अटकेत

ओएलएक्सवर दुचाकी खरेदी करताय मग हे ऐका. मुंबईतील दुचाकी चोरट्यांनी दुचाकी विकण्याचा एक नवा फंडा बाजारात आणला अाहे. चोरलेली दुचाकी ओएलएक्सवर टाकून त्याची बनावट कागदपत्रे बनवून हे चोर ती दुचाकी विकत आहेत. नुकतंच मनीष नाईक या  चोराला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मनीष मुलुंड परिसरात राहणारा आहे. 

अर्ध्या किंमतीत दुचाकी

मुलुंडच्या नवघर रोड परिसरात राहणारा मनीष नाईक त्याच्या एका साथीदारांच्या मदतीने निर्जनस्थळी उभ्या असलेल्या दुचाकी चोरायचा. त्यानंतर त्या दुचाकीवरील चेसी नंबर आणि खोट्या नंबरप्लेटद्वारे त्यांचे बनावट कागदपत्र बनवून दुचाकी ओएलएक्सवर अर्ध्या किंमतीत विकण्यासाठी काढायचा. काही दिवसांपूर्वीच मुलुंड पोलिस ठाण्यात एक व्यक्तीने आपल्याला ओलएलएक्सवर एकाने चोरीची दुचाकी विकल्याचे निदर्शनास आणून दिले.

बनावट नंबर

त्या व्यक्तीने दुचाकी विकत घेतल्यानंतर त्या दुचाकीविषयी आरटीओत चौकशी केली. त्यावेळी त्याला मिळालेला दुचाकी नंबर कुठेही रजिस्टर नसल्याचं अाढळून आलं. ही दुचाकी त्याला मनिषने विकली होती. पोलिसांनी मनिषला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने सर्व गुन्ह्यांची कबूली दिली. 

अन्य आरोपीचा सहभाग 

आई आजारी अाहे, आर्थिक अडचण अाहे अशी कारणे सांगून मनिष ओएलएक्सवर दुचाकी विकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या गुन्ह्यात त्याच्यासह अन्य एका आरोपीचाही सहभाग असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. या आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना गंडवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


हेही वाचा - 

कामगार रुग्णालयातील आगीप्रकरणी दोघांना अटक, मृत्यूचा आकडा दहावर

६२६ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी दोघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या