VJTIच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिस तक्रार दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • क्राइम

माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिट्युट (व्हीजेटीआय)मधील विद्यार्थिनीचा त्याच कॉलेजमध्ये गणित शिकवणाऱ्या प्राध्यापकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी युवासेनेने आक्रमक पावित्रा घेत सोमवारी २८ मे रोजी व्हीजेटीआय कॉलेजमध्ये जाऊन सदर प्राध्यापकाला निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

नेमकं झालं काय?

व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी शुक्रवारी १८ मे रोजी गणित विषयाच्या जर्नलवर सही घेण्यासाठी गणिताचे प्राध्यापक बी. जी. बेलापट्टी यांच्याकडे गेली होती. मात्र तिला जर्नलवर लगेचच सही न देता बेलापट्टी यांनी तिला दिवसभर ताटकळत ठेवले. त्यानंतर संध्याकाळी ५.१५च्या सुमारास सर्वजण घरी गेल्यानंतर आपल्या केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

तक्रार निवारण समितीकडून टाळाटाळ

दरम्यान, पीडित मुलीने, सोमवारी २१ तारखेला कॉलेजमधील महिला तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु, या लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष करत गेल्या दहा दिवसांत आम्हाला अशा प्रकारे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत महिला तक्रार निवारण समितीकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नव्हती.

पीडित मुलीची युवासेनेकडे धाव

१० दिवस उलटूनही आपण केलेल्या तक्रारीवर समितीकडून दाद मिळत नसल्यामळे पीडित मुलीने युवासेनेकडे धाव घेतली. त्यानंतर या मुलीने दिलेल्या लेखी तक्रारीची व या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत २८ तारखेला व्हीजेटीआय कॉलेजमध्ये सिनेट सदस्य व शिवसेनेच्या स्थानिक  कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यावेळी कॉलेज प्रशासनाकडे मागण्यांचे परिपत्रक सादर करण्यात आले. 'सदर प्राध्यापकाला तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच महाविद्यालयात बंद पडलेले सर्व सीसीटीव्ही त्वरीत सुरू करावेत', असं या परिपत्रकात सांगितलं आहे.

 

 

या प्रकरणी प्राध्यपकाला निलंबित करावे, अशी मागणी आम्ही युवासेनेमार्फत केली आहे. त्या पीडित मुलीचे आम्हाला कौतुक असून, तिचा विनयभंग होऊनही ती कोणत्याही प्रकारे मागे न हटता तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीची दखल कॉलेज प्रशासनकडून घेतली गेली असून संबंधित प्राध्यपकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साईनाथ दुर्गे, युवासेना कार्यकारणी सदस्य


हेही वाचा

मुंबईही कठुआच्या वाटेवर..? रोज २ महिलांवर बलात्कार

पुढील बातमी
इतर बातम्या