वानखेडे स्टेडियम पुन्हा वादात, आयपीएल मॅच दरम्यान तरुणीचा विनयभंग

एका २२ वर्षीय तरूणीसोबत विनयभंगांची घटना घडल्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पुन्हा वादात अडकलं आहे. सचिन तेंडुलकर गॅलरीत हा प्रकार घडला. या प्रकरणी गेंदराज दादूलाल सतनामी (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वानखेडे स्टेडियम पुन्हा वादात, आयपीएल मॅच दरम्यान तरुणीचा विनयभंग
SHARES

शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आयपीएल मॅच दरम्यान चौकार, षटकारांची आतिषबाजी होत असतानाच एका २२ वर्षीय तरूणीसोबत विनयभंगांची घटना घडल्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पुन्हा वादात अडकलं आहे. सचिन तेंडुलकर गॅलरीत हा प्रकार घडला. या प्रकरणी गेंदराज दादूलाल सतनामी (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

वानखेडे स्टेडियमध्ये महागडं तिकिट काढून हजारो प्रेक्षक खेळाचा आनंद लुटण्यासाठी येतात. या प्रेक्षकांमध्ये तरुणी आणि महिलांचं प्रमाणही लक्षणीय असलं, तरी त्यांच्या सुरक्षेची काळजी आयपीएल मॅच दरम्यान घेतली जाते का? असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे.



नेमकं काय झालं?

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेली मॅच बघण्यासाठी पीडित तरुणी विलेपार्लेहून तिच्या मित्रांसोबत आली होती. ती मित्रांसह स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँड लेव्हल २ मध्ये बसली होती. त्यावेळी आरोपी गेंदराज दादूलाल सतनामी पाण्याची बाटली घेऊन तिथं आला. त्याने पीडितेच्या पुढं हातातली बाटली पुढं केली. मात्र पीडित तरुणीने पाणी नको असल्याचं सांगत त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.


अश्लील वर्तन

मात्र गेंदराज पुन्हा पुन्हा पाणी घेण्यासाठी पीडित मुलीला जबरदस्ती करत होता. त्यावेळी पीडित तरुणीचे सर्व मित्र मॅच बघण्यात मग्न होते. त्यानंतर गेंदराजने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने त्याला रोखलं आणि ती दुसऱ्या आसनावर बसण्यासाठी निघाली. तेव्हा गर्दीत गेंदराजने तरूणीशी अश्लील वर्तन केलं. तरुणीने आरडा ओरडा केल्यावर गेंदराज तिथून पळ काढू लागला.



पोलिसांनी 'असं' पकडलं

स्टेडियममध्ये काही अंतरावर तरुणीने गेंदराजचा पाठलाग केला. मात्र गर्दीचा फायदा घेत गेंदराज निसटत असल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने आपल्या सोबत घडलेला प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिस शिपायाला सांगितला. त्यानंतर पोलिस शिपायाने गेंदराजचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं.


पोलिस कोठडी

या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गेंदराजविरोधात गर्दीचा फायदा घेऊन तरुणींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेंदराज हा इंडियन ओव्हरसीज बँक जवळील फूटपाथ, सय्यद काझीस्ट्रीट वडगादी मस्जीद बंदर परिसरात राहतो. पोलिसांनी गेंदराजला अटक केली असून त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्टेडियमवरील गर्दीत अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत हे कृत्य केलं आहे. या प्रकरणावेळी गेंदराज तिथं होता. मात्र त्याच्या विरोधात चुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही तपासल्यावर खऱ्या आरोपीची ओळख पटेल.
अॅड, सुनील पांडे, गेंदराजचे वकील



हेही वाचा-

गँगस्टर रवी पुजारीकडून विकासकाला धमकी, गुन्हे शाखा ८ कडे तपास

जेव्हा, पोलिसालाच जडतो चोरीचा छंद..!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा