व्हेंटिलेटरसाठी १५ लाखांच्या लाचेची मागणी, ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला अटक

ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने गुरूवारी सायंकाळी अटक केली. डॉ. राजू मुरुडकर असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी १५ लाख रुपयांची लाच मागितली होती.

मुरुडकर ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. कोविड काळात सर्व कंत्राटे आणि हॉस्पिटल विषयक व्यवहार त्यांच्याच माध्यमातून केले जात होते. इमिनोशॉप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ठाणे महानगर पालिकेला ३० व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी निविदा भरल्या होत्या. ही निविदा १.५ कोटींची होती. ती मंजूर करण्यासाठी मुरुडकर यांनी एकूण रकमेच्या १० टक्के म्हणजेच १५ लाखाची मागणी केली होती. यापैकी ५ लाख रुपये मुरुडकर यांनी ऐरोलीतील लाईफलाईन रुग्णालयात घेतले. हे पैसे घेत असताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून त्यांना रंगेहात अटक केली.

ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेंटिलेटर बेडची मागणी जास्त प्रमाणात येऊ लागली आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेने व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात डॉक्टर राजू मुरुडकर हे प्रमुख भूमिका बजावतात आणि याच अधिकाराचा फायदा घेऊन डॉक्टर राजू मुरुडकर यांनी व्हेंटिलेटर बनवणाऱ्या कंपनीकडून लाचेची मागणी केली. 



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

पुढील बातमी
इतर बातम्या