दादर फूल मार्केटमधील हत्येप्रकरणी तिघांना दिल्लीतून अटक

 दादर फूल मार्केटमध्ये फुले आणि वजन काटा पुरवणाऱ्या मनोज मौर्या याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून तिघांना अटक केली आहे. कृष्ण कुशवाह (३७), राजेंद्र अहेरवार (३०), हेमेंद्र कुशवाह अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातूनच ही हत्या केल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दुचाकीस्वारांकडून गोळीबार

दादर फूल मार्केट परिसरात मनोज मोर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक वर्षांपासून काम करत होता. पूर्वी फुलांची विक्री करणाऱ्या मनोजने कालांतराने इलेक्ट्रीक वजन काटा पुरवण्याचाही व्यवसाय सुरू केला होता.  नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे हत्या झाली त्या दिवशी सकाळी फुले खरेदी करणाऱ्यांची गर्दी होती. नेहमी प्रमाणे मनोज सकाळी ५ वाजता सेनापती बापट मार्गावरील प्रमोद महाजन गार्डनजवळ आला होता. हातातली कामं अटपत असताना परळहून आलेले दुचाकीस्वार त्याच्यावर गोळ्या झाडून फरार झाले.

५० हजारांची सुपारी 

गोळीच्या आवाजांनी सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. सर्वांनीच मनोजच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोजला व्यापारी आणि विक्रेत्यांनी परळच्या केईएम रुग्णालयात  हलवले. मात्र डाॅक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मौर्याच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी या तिघांची नावं पुढे आली. व्यवहारातून कुशवाह आणि मौर्या यांच्यात वाद झाला होता. या रागातून कुशवाह याने ५० हजार रुपयांची सुपारी देऊन मौर्याचा काटा काढल्याचं उघडकीस अालं अाहे. 


हेही वाचा -

वडाळ्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक

नोकरीचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक


 

पुढील बातमी
इतर बातम्या