पराभवाचा सूड घेण्यासाठी महिलांचे फोटो अमेरिकन बेवसाइटवर टाकले

इमारतीच्या सोसायटीच्या निवडणूकीत पराभव झाल्याच्या रागातून एका विकृताने इमारतीतील दोन महिलांचे नंबर अमेरिकेतील वेबसाइटवर टाकून बदनामी केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अल्पेश पारेख (४७) या विकृताला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

पराभव जिव्हारी

मालाडच्या एका नामांकीत इमारतीत अल्पेश हा राहत असून काही दिवसांपूर्वी त्याच्या सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अल्पेशचा पराभव झाला होता. हा पराभव अल्पेशच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभव करणाऱ्या इमारतीतील महिलेला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकेच्या locanto.net या वेबसाईटवर इमारतीतील दोन महिला आणि एका पुरूषाची फोटोसह माहिती दिली. शरीरसुखासाठी किंवा रिलेशनशिपसाठी अनेकजण या वेबसाईट भेट देत असतात.

या वेबसाईटवर महिलांचे फोटो आणि नंबर दिल्यामुळे १४ एप्रिल रोजी महिला कामावर असताना तिला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर त्याने महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेने फोनवरील व्यक्तीकडे अधिक विचारणा केली असता त्याने अमेरिकेच्या locanto.net या वेबसाईटहून फोटो आणि माहिती मिळाल्याचे सांगितले. त्याने महिलेच्या व्हाॅट्सअॅपवर ती लिंक ही पाठवली.

मैत्रिणीचेही फोटो वेबसाइटवर

त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या नंबरहून वारंवार फोन आणि मेसेज येऊ लागले.  संबंधीत लिंकवर जाऊन महिलने पाहणी केली असता तिच्या फोटोसह तिच्या इमारतीतील मैत्रिणीचेही फोटो वेबसाइटवर होते. या प्रकरणी दोघींनी मालाडच्या बांगूरनगर पोलिसात तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता  हा गुन्हा गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिलांचे ते फोटो अपलोड करणाऱ्या साईटचा माग काढला असता ते फोटो अल्पेश याने त्याच्या आयडीहून अपलोड केल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.


हेही वाचा  -

गुंड प्रसाद पुजारीविरोधात आरोपपत्र सादर

एम्फेटामाईन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; १५ कोटींचं ड्रग्ज हस्तगत


पुढील बातमी
इतर बातम्या