भारतातून ६०० महिलांना परदेशातल्या वेश्या व्यवसायात ढकललं

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने महिलांची भारतातून बहरीनला तस्करी करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वीच भांडाफोड करत तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत ६०० हून अधिक महिलांना परदेशातील वेश्या व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी टिंकू राज याच्या घरात परदेशात पाठवण्यात येणाऱ्या ६० महिलांचे पासपोर्ट पोलिसांना आढळून आल्याने या महिलांना परदेशात पाठवण्याआधीच रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तृतीयपंथी टोळीचा हात

अवघ्या काही लाख रुपयांत बहरीन येथील वेश्या व्यवसायात महिलांना ढकलणाऱ्या या टोळीमागे एका तृतीयपंथी आंतरराष्ट्रीय टोळीचा हाथ असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बहरीन येथील वेश्या व्यवसायात अडकलेल्या नागपाडा येथील २४ वर्षीय महिलेची पैसे भरून तिच्या कुटुंबीयांनी सुटका केल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने या टोळीतील मुंबईत वास्तव्यास असलेले मोहम्मद शेख (५६), टिंकू राज (३६) या दोन हस्तकांसह एकाला नुकतीच अटक केली आहे.

'अशी' करायचे मुलींची खरेदी

टिंकू हा तृतीयपंथी प. बंगाल, राजस्थान, उडिसा, नेपाळ या ठिकाणी आर्थिक स्थिती बेताची असलेल्या महिलांना हेरायचा. त्यांची ३ महिन्यांसाठी ३ ते ४ लाख रुपयांत खरेदी करायचा. या ३ महिन्यांत हव्या त्या वेळेला बहरीन येथील नागरिकांकडे शरीरसुखासाठी पाठवायचे. या ३ महिन्यांत त्यांच्याकडून ही टोळी १५ ते २० लाख रुपये कमवायची.

फक्त ३ महिन्यांसाठी

या सर्व मुली २० ते ३० वयोगटातील असल्याचीही माहिती पुढे आली आहे. ३ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर या मुली पुन्हा भारतात पाठवल्या जात. त्यानंतर त्या मुलींना पुन्हा पाठवण्यात येत नसायचं. आतापर्यंत या टोळीने वर्षभरात ६०० हून अधिक मुलींना परदेशात पाठवल्याची माहिती या आरोपींच्या चौकशीतून मिळाली आहे. या प्रकरणातील आंतराष्ट्रीय टोळीतील गुन्हेगारांची संख्या आणि गुन्ह्यांची व्यप्ती मोठी असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.


हेही वाचा-

'हे' आहेत रेल्वेतील सराईत मोबाइल चोर

लाच घेणारा म्हाडाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात


पुढील बातमी
इतर बातम्या