भायखळ्यात पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की, दोघांना अटक

मुंबई महापालिकेच्या सह अभियंत्यांना भायखळ्यातील कार्यालयात घुसून धक्काबुक्की करणाऱ्या दोन आरोपींना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्यांना झालेली ही मारहाण कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच आधारे अाग्रीपाडा पोलिसांनी मुश्ताक सय्यद आणि सेहबाज सय्यद नावाच्या दोघांना अटक केली आहे.

भायखळ्यातील ई वॉर्ड कार्यालयात सतीश मालेकर सह अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मालेकर यांच्याकडे वॉर्डातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची जाबाबदारी आहे. त्यानुसार परिसरातील एक इमारत पाडावी याकरीता संबंधीत आरोपी मालेकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.

सोमवारी ११ सप्टेंबरला आरोपींनी मालेकर यांच्या कार्यालयात येऊन हुज्जत घालायला सुरूवात केली. आरोपींनी जवळपास अर्धा तास शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यानंतर मालेकर यांनी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली.

तर, हुज्जत घालणाऱ्या दोन्ही आरोपींनी देखील अाग्रीपाडा पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना कार्यालयात बोलावून घेतले आणि मालेकर त्यांच्याकडून २ लाख रुपये मागत असल्याचा आरोप करू लागले.

मी माझ्या वॉर्डातील ९० ते ९५ टक्के अनधिकृत बांधकामे तोडली आहेत. त्यामुळे अनेकांचा माझ्यावर राग आहे. आमच्या वॉर्डात डिमटिमकर रोडवरील सय्यद मंजिल नावाची इमारत अलिकडे एका विकासकाने विकत घेतली असून हा विकासक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून इमारत पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू लागला आहे. मी या इमारतीचे रेकॉर्ड बघितल्यावर ही इमारत उपकर वर्गात मोडत असल्याचे माझ्या लक्षात आले. अशा इमारती म्हाडाच्या अंतर्गत येत असल्याने महापालिका त्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही. हे मी या विकासकाला सांगितो. पण तो ऐकून घेण्यास तयार नाही.

- सतीश मालेकर, सह अभियंता, ई वॉर्ड, महापालिका

परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मुश्ताक सय्यद आणि सेहबाज सय्यद या दोघांनाही सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिवीगाळ करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.


हे देखील वाचा -

आ. अमित साटम यांची जुहूत फेरीवाल्यांना मारहाण, पोलिसांनाही शिवीगाळ


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या