एमएसआरडीसी कार्यालयात राडा, अधिकाऱ्यांना मारहाण, शाईफेक

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • क्राइम

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)च्या वांद्रे-वरळी सी लिंक येथील कार्यालयात सोमवारी दुपारी चांगलाच राडा झाला. महिला-पुरूषांचा जमाव एमएसआरडीसीच्या कार्यालयात घुसला आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. काहींनी तर अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीत एक अधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्याने दिली.

नेमकं काय झालं?

दुपारी अकरा-साडे अकराच्या सुमारास ८ ते १० महिला-पुरूषांचा जमाव कार्यालयात घुसला आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अगदी फाईलपासून ते खुर्चीपर्यंत हातात मिळेल ती वस्तू अधिकाऱ्यांना फेकून मारण्यास सुरूवात केली. या मारहाणीत विभागीय अभियंता सचिन निफाडे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

३ जणांना अटक

या जमावानं अधिक्षक विवेक नवले यांच्यावर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाणे, पश्चिम इथं गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र मारहाण करणारी ही लोकं नेमकी कोण होती, ती कुठून आली होती आणि त्यांचं नेमकं म्हणण काय होत? याविषयी काहीही माहिती नसल्याचं एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा-

हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत

सी लिंकचा प्रवास महागणार -१ एप्रिलपासून नवे दर


पुढील बातमी
इतर बातम्या