अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक

अल्पवयीन मुलांचे अपहरणकरून त्यांच्या अंगावरील सोनं चोरणाऱ्या ठग महिलेला देवनार पोलिसांनी अटक केली आहे. संजना देविदास बारिया असे या महिलेचे नाव आहे.  या महिलेने देवनार परिसरातून दोन मुलींना तर घाटकोपरमधून ४ मुलांचे आतापर्यंत अपहरण करून लुटल्याचे पुढे आले आहे.  

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट

गोवंडीतील पाटीलवाडीमध्ये आपल्या आजारी आजोबांना पाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी मावशीकडे संध्या संदीप गंगावणे ही १२ वर्षाची चिमुरडी तिच्या आईसह साताऱ्यावरून भेटण्यास आली होती. सकाळी संध्याला तिच्या आईने बाजूच्या दुकानावर साबण आणण्यास पाठविले होते. ती जेव्हा दुकानावर आली तेव्हा तिला आरोपी महिला संजना हिच्यासोबत तिची चार वर्षाची मावस बहीण दिव्या मारुती माने ही दिसली. त्यावेळी संजनाने मुलींना मी त्यांच्या आईची मैत्रिण असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या आईनेच मंदीरात नेहण्यास सांगितले असल्याचे मुलींना सांगितले. त्यासाठी तिने दोन्ही मुलींना चॅकलेटचे आमीष ही दाखवले.

रिक्षात बसवून त्यांना घाटकोपर बस आगारच्या दिशेने आणले. त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिने या मुलींचे अपहरण केले होते. परंतु, घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येताच या मुली जोरात रडू लागल्याने आरोपी महिला त्यांना तिथेच सोडून निघून गेली. परंतु, संध्याने त्वरित तिच्या मावस बहिणीला काही अंतरावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडे नेवून त्यांना आपल्या वडिलांना फोन लावण्यास सांगितले.

हेही वाचाः- प्रवाशांची फसवणूक केली तर रोज रिक्षा फोडणार- नितीन नांदगावकर

 सुदैवाने संध्याला घरातल्यां सर्व सदस्यांचे मोबाइलनंबर तोंड पाठ असल्यामुळे पोलिसांना संध्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहचता आले. संध्याच्या कुटुंबियांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपी महिलेचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपी महिलेने पंतनगर परिसरातून अशाच प्रकारे ४ मुलांचे ही अपहरण केल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी मोठ्या कौशल्येने तपासकरत महिलेला अटक केली. पोलिसांची तत्परता आणि चिमुरडीने दाखविलेली समयसूचकता यामुळे ही महिला आरोपी गजाआड झाल्याची माहिली वरिष्ठांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या