'मोक्ष' मिळवून देण्याच्या नावाखाली 'तो' करायचा महिलांसोबत दुष्कृत्य

हयातीत सत्कार्य करायचे सोडून अनेकजण मृत्यूनंतर 'मोक्ष' कसा मिळेल, यासाठी धडपडतात आणि अलगद फसवणूक करणाऱ्यांचे भक्ष्य बनतात. अशीच एक घटना शिवडीत घडली असून 'मोक्ष' मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांसोबत दुष्कृत्य करणाऱ्या एका तथाकथित योगगुरुला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा योगगुरू मुंबईत एक योग अॅकॅडमी चालवत असून सध्या तो जामिनावर सुटला आहे. शिवराम राऊत असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम शिवडीमध्ये शिओम तीर्थ नावाने एक अॅकॅडमी चालवत आहे. त्याच्या अॅकॅडमीत मोठ्या संख्येने महिला आणि पुरूष योग शिकण्यासाठी येतात. नोव्हेंबर 2016 मध्ये योग शिकवण्याच्या बहाण्याने शिवरामने तक्रारदार महिलेसोबत छेडछाड केली होती. एवढेच नव्हे, तर 'मोक्ष' मिळवून देण्याच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही तो सातत्याने तिच्यावर दबाव टाकत होता.

पीडित महिलेने या प्रकाराचा विरोध केल्यावर चूक झाल्याचे सांगून तो काही काळ गप्प बसत असे, त्यानंतर पुन्हा महिलेसोबत छेडछाड करत असे. अखेर या योगगुरूच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून पीडित महिलेने आर. के. मार्ग पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी योगगुरूला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यावर अॅकॅडमीतील आणखी पाच महिलांनीही पुढे येऊन त्याच्याविरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तथाकथित योगगुरूला न्यायालयापुढे हजर केल्यावर न्यायालयाने त्याला 15 हजार रुपयांच्या जामिनावर सोडून दिले.



हे देखील वाचा -

चारकोपमध्ये चालत्या कारमध्ये बलात्कार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या