अकरावीच्या पहिल्या फेरीत ५० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

सध्या मुंबईसह राज्यभरात मिशन अकरावी अॅडमिशनला सुरूवात झाली आहे. याच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई विभागातून १ लाख २० हजार ५६६ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले असून त्यापैकी ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

२ दिवस वाढवून मिळाले

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ६ ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा होता. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २ दिवस वाढवून देण्यात आले. त्या दरम्यान आतापर्यंत ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून ६९ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत.

दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी पात्र

ज्या विद्यर्थ्यानी प्रवेश घेतलेले नाहीत, ते विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेशास पात्र ठरणार आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीतील २७५ विद्यार्थ्यानी प्रवेश रद्द केले असून २८७ विद्यार्थ्यांनी हे प्रवेश नाकारले आहेत.

मुंबईकर विद्यार्थ्यांना फायदा

शिक्षण विभागाने बुधवारी वाढवून दिलेल्या मुदतवाढीचा सर्वाधिक फायदा मुंबई विभागातील विद्यार्थ्यांना झाला. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तब्बल २ हजार २२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान शिक्षण विभागानं ही मुदत वाढवली नसती तर या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायची इच्छा असूनही प्रवेश घेता आले नसते, असं मत विद्यार्थ्यानी व्यक्त केलं.

राज्यभरात किती प्रवेश?

राज्यभरात अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या विभागांतून मिळून ९५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश निश्चित केले आहेत.


हेही वाचा-

शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलैला

शिक्षक भरतीसाठी पवित्र वेबपोर्टल सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या