Advertisement

शिक्षक भरतीसाठी पवित्र वेबपोर्टल सुरू


शिक्षक भरतीसाठी पवित्र वेबपोर्टल सुरू
SHARES

महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गुणवत्तेवर आधारित व पारदर्शक पद्धतीनं व्हावी या उद्देशानं शिक्षण विभागानं 'पवित्र' या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. शुक्रवार ६ जुलैपासून या वेबपोर्टलची सुरूवात करण्यात आली असून याद्वारे सर्व शाळांमधील १ ते १२ पर्यंतच्या शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. 

या भरतीत स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदातिन व विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.


रिक्त पदांची माहिती बंधनकारक

सध्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही प्रत्येक विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाते. मात्र, आता पवित्र या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही भरती केंद्रीय पद्धतीनं एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. तसंच एखाद्या शाळेत शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संबंधीत विभागानं रिक्त पदांची माहिती पवित्र या वेबपोर्टलवर देणं बंधनकारक असणार आहे. तसच त्याबाबतची जाहिरातही स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करावी लागणार आहे.


६ जुलैपासून अर्ज 

शालेय शिक्षण विभागानं २० जून २०१८ ला प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात याबाबतची कार्यपद्धती दिली असून ६ जुलैपासून पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यामध्ये पात्र झालेले अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा युजर आयडी असणार आहे.


भरती प्रक्रियेतील टप्पे

या भरतीसाठीच्या पहिल्या टप्प्यात पवित्र वेबपोर्टलवर जाऊन स्वतची माहिती भरावी लागेल. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात शाळा व संस्थांनी पवित्र वेबपोर्टलवर ऑनलाईन तसंच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करणे. यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे संस्थांच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी २० पसंतीक्रम निवडणे. आणि शेवटचा चौथा टप्पा म्हणजे या गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध करून देणे.


वेळापत्रक पवित्रवर

यंदा अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा १ लाख ७८ हजार उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे तसंच प्रवर्ग व समांतर आरक्षणांतर्गत उपलब्ध असणाऱ्या जागा, उमेदवारांने भरलेला पसंतीक्रम याद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. पवित्रच्या माध्यमातून अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये याची दक्षता विभागातर्फे घेण्यात आली असून विद्यार्थ्यांचा आसन क्रमांकानुसार अर्ज करण्याचं वेळापत्रक पवित्र वेबपोर्टलवर देण्यात आलं आहे.



हेही वाचा -

शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलैला

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा