अखेर फाकेहाला परीक्षेची परवानगी नाहीच

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

भिवंडीमधील कॉलेजने आधी हिजाबबंदी करत वर्गात बसू देण्यास मनाई केल्याने आपली हजेरी कमी भरली आणि आता त्या कारणाने जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येत आहे, असे सांगत दाद मागणाऱ्या मुंबईतील विद्यार्थिनी फाकेहा बदामी हिला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, हजेरीचे दिवस पूर्ण करून डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेला बसण्याची मुभा तिला देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फकेहाने भिवंडीच्या साई मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथीच्या कोर्सला २०१६ मध्ये प्रवेश घेतला होता. डिसेंबर-२०१६ मध्ये वर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मुलींनी हिजाब घालणे बंद केले तर अनेकींनी कॉलेजमधून बाहेर पडणे पसंत केले.

२०१७ मध्ये कोर्टात धाव

मात्र, 'मी हिजाब घालणे सोडणार नाही,' अशा शब्दांत नकार देत तिने केंद्र सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर विविध सरकारी यंत्रणांनी कॉलेजला आदेश दिल्यानंतरही कॉलेजने त्याला जुमानले नाही,' असे म्हणत फाकेहाने नोव्हेंबर-२०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका केली होती. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फाकेहाला वर्गात बसू देण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, १ जूनपासून सुरू होणाऱ्या पुनर्परीक्षेला बसू देण्यास कॉलेज प्रशासन हजेरीच्या मुद्यावरून मनाई करत असल्याने फाकेहाने पुन्हा एकदा अॅड. सारीनाथ सारीपुत्त यांच्यामार्फत कोर्टात याचिका केली होती.

केवळ २८ दिवसांची उपस्थिती

दरम्यान, याविषयी न्या. शाहरुख काथावाला व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता, फाकेहाला हिजाबमुळे वर्गात बसू दिले नाही आणि त्यामुळे तिची उपस्थिती कमी भरली, या आरोपांचे कॉलेजतर्फे अॅड. साहिल साळवी यांनी खंडन केले. तसेच, वर्गात बसू दिल्यानंतरही फाकेहाने केवळ २८ दिवस उपस्थिती लावली असल्याने मेडिकलच्या परीक्षेला तिला बसू दिले जाऊ शकत नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले.

'पुनर्परीक्षेला बसू द्या'

'मेडिकल कोर्स असताना एवढ्या कमी उपस्थितीमध्ये परीक्षेला बसू देण्याची परवानगी आम्ही कशी देऊ शकतो?', असा प्रश्न खंडपीठानेही उपस्थित केला. अखेर 'हिजाब घातले म्हणून कॉलेजने फाकेहाला प्रवेश नाकारू नये आणि तिने आवश्यक संख्येत लेक्चर्सना हजेरी लावल्यानंतर तिला डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेला बसू द्यावे', असे निर्देश कॉलेजला देऊन खंडपीठाने तिची याचिका निकाली काढली.


हेही वाचा

परीक्षेच्या १ दिवस आधी आले हॉल तिकीट, लॉच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट!

पुढील बातमी
इतर बातम्या