CBSE Exams: दहावीच्या परीक्षा रद्द!, बारावीच्या परीक्षा पुढं ढकलल्या

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) ने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे गुणपत्रिका देण्यात येणार असून यामुळे त्यांच्या ११ वी प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. तर १२ वी च्या परीक्षांसाठी १ जून रोजी शिक्षण मंडळाकडून आढावा घेण्यात येईल.

देशामध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या प्रमाणामुळे शिक्षण मंडळांसोबतच विद्यार्थी आणि पालक देखील चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे पालकांकडून देखील दहावी, बारीवीच्या परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी होत होती. यावर विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री डाॅ. रमेश पोखरीयाल निशंक यांच्यासोबत बैठक घेतली. 

परीक्षेची संधी

या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीची परीक्षा ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होती. सरसकट उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचं काय? हा प्रश्न सोडवण्यासाठी आॅब्जेक्टिव्ह क्रायटेरियावर आधारीत गुणपत्रिका तयार करून त्या विद्यार्थ्यांना देण्यात येतील. तसंच जे विद्यार्थी गुणपत्रिकांवर समाधानी नसतील, अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजिक करून त्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं पोखरीयाल यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- 10th, 12th Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

१५ दिवस आधी नोटीस

तर, १२ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण मंडळाकडून १ जून रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांना किमान १५ दिवस आधी त्याबाबतची नोटीस काढून कळवण्यात येईल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

राज्याच्या परीक्षाही पुढं 

दरम्यान २ दिवस आधीच कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. 

प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. सोबतच ११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या परीक्षा देखील पुढं ढकलण्यात आल्या आहेत.

(CBSE Board Exams for Class 10th cancelled and 12th postponed)

हेही वाचा- बीएमसीच्या लिपिक पदाच्या लेखी परीक्षा रद्द
पुढील बातमी
इतर बातम्या