११वी प्रवेशासाठी महाविद्यालयांची बुधवारपासून नोंदणी

यंदाच्या ११वी प्रवेश प्रक्रियेच्या महाविद्यालयीन नोंदणीसाठी १ जुलैपासून उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश प्रक्रियेची लिंक ओपन केली जाणार आहे. या लिंकच्या साहाय्यानं महाविद्यालयांनी मागील वर्षी भरलेल्या माहितीत काही बदल करायचे असल्यास करता येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉग इन आयडी व पासवर्ड २०१९-२० मध्ये नोंदणी केलेल्या माहितीतील नोंदणीकृत पत्त्यावर १ जुलैपासून पाठवण्यात येणार आहे.

महाविद्यालयांनी त्या लॉग इन, पासवर्डच्या साहाय्यानं ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करायचा आहे. तर, शालेय मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना नवीन तरतुदींची माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने ऑनलाइन प्रशिक्षणाचं नियोजन केलं आहे.

देशभरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळं सर्वच यंत्रणा बंद पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांना अर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. तसंच, कोरोनाचा संसर्ग वाढू नये व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेता शिक्षण मंडळानं शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज साडे तीन महिने झाले तरी शाळा कॉलेज बंद आहेत. आशातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळं या प्रश्नावर विचार करत व विद्यार्थी, पालकांना दिलासा देत ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं. त्याशिवाय आता हळुहळू शैक्षणिक अभ्यास क्रमालाही सुरूवात होत आहे.


हेही वाचा -

सम विषम नियम लागू केल्यास टळेल वाहतूक कोंडी

मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज


पुढील बातमी
इतर बातम्या