महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एसएससी (दहावी) बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. बारावीप्रमाणं यंदा दहावीच्या परीक्षेचे अर्ज सरल पोर्टलच्या माध्यमातून भरले जाणार असून ५ नोव्हेंबरपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
राज्यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस अर्ज करतात. त्यानुसार यंदाही दहावीच्या नियमित पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आलं आहे. यंदाही १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार असून या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
१ मार्चपासून परीक्षा
बारावीप्रमाणे यंदा दहावीचे अर्जही सरल या डेटाबेसवरून करायचे असून ५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासही सुरूवात झाली असून येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१९ या दरम्यान घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणार आहे.
हेही वाचा -
प्रभारींचा भार होणार हलका, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढली जाहिरात
यंदाही विद्यापीठाचा परीक्षा गोंधळ; बीएसस्सी सेमिस्टर परीक्षा लांबणीवर