३ मेनंतर होणार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबत निर्णय

मुंबईसह राज्यातील कोरोनोची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्यानं लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली. देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळं वाढलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांबाबत ३ मेनंतर निर्णय जाहीर करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच विद्यापीठानं अर्ज भरण्यासही मुदतवाढ दिली आहे. त्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. परिस्थितीचा ३ मे रोजी आढावा घेऊन आणि शासनाच्या पुढील आदेशानुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.

मानव्यविद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा या ४ विद्याशाखांच्या ७५९ परीक्षा प्रलंबित आहेत. टाळेबंदी वाढविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन व विद्यापीठे परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूर्वक विचार करीत आहे. यासंदर्भात लवकरच  निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. तसंच, ९वी व ११वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परीक्षांबाबत निर्णयही लॉकडाऊननंतर घेण्यात येणार असल्याचं समजतं. 


हेही वाचा -

Coronavirus Updates: धारावीत आढळले नवे २६ कोरोनाग्रस्त

राज्यात २८६ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३२०२ वर


पुढील बातमी
इतर बातम्या