University Exams: यूजीसीचे उपाध्यक्ष की आधुनिक द्रोणाचार्य? परीक्षा घेण्यावरून विद्यार्थी भारती आक्रमक

कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC)ने सर्व विद्यापीठांना सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठांना कुठल्याही परिस्थितीत पाळाव्याच लागतील, असं यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितलं होतं. यूजीसीच्या या भूमिकेवर विद्यार्थी भारती संघटनेने हल्ला चढवला आहे.  

तर आमरण उपोषण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं ठरतं की परीक्षा? असा प्रश्न विद्यार्थी भारतीने उपस्थित केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आॅनलाईनच्या माध्यमातून परीक्षा देणं प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नाही, असं खुद्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सांगत असताना अशा स्वरूपाचा पर्याय देत विद्यापीठांना परीक्षा घ्यायला सांगणं कितपत योग्य आहे? यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी यावर विचार केला पाहिजे. परीक्षांच्या मुद्द्यावर लवकरच अंतिम निर्णय झाला नाही, तर विद्यार्थी भारती आमरण उपोषण सुरू करेल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. 

हेही वाचा - University Exams 2020: यूजीसीच्या सूचनेनुसार परीक्षा घ्याव्याच लागतील!

ही भूमिका तर...

यासंदर्भात विद्यार्थी भारती संघटनेची अध्यक्षा मंजिरी धुरी म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात परीक्षांचं आयोजन करणं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं ठरू शकतं, असं महाराष्ट्रातील १३ विद्यापीठ सांगत आहेत. तरीही यूजीसीच्या निर्देशाचं विद्यापीठांना पालन करावंच लागेल, असं पटवर्धन कसं काय म्हणू शकतात? ही गोष्ट इतकी सोपी वाटते का? उपाध्यक्षांची ही भूमिका आधुनिक द्रोणाचार्यांची आहे.

वादाची ठिणगी

केंद्रीय गृहमंत्रालयानं विद्यापीठ परीक्षांना परवानगी देत या परीक्षा यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे नवीन वादाची ठिणगी पडली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही विद्यापीठांची नियामक संस्था आहे. राज्य शासनाला विश्वासात घेणं आयोगाच्या कक्षेत नाही. त्यामुळे यूजीसीने केलेल्या सूचना कायद्यानुसार विद्यापीठांना बंधनकारक आहेत. काही लोकं परीक्षांबाबत जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करत असून परीक्षा घेण्याबाबत यूजीसी कुठलाही फेरविचार करत नाहीय. आमच्याशी चर्चाच केली नाही हे आरोप चुकीचे आहेत, असं यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे. 

 हेही वाचा - University Exams 2020: तर परीक्षा घ्यायच्या कशा? उदय सामंत यांचा यूजीसीला सवाल

पुढील बातमी
इतर बातम्या