राज्यातही बारावी परीक्षा होणार रद्द?

वाढत्या कोरोनाचा (coronavirus) फटका आता विद्यार्थ्यांनाही बसला आहे. कारण १२वीची परीक्षा होणार की नाही यामुळं अनेक विद्यार्थी गोंधळात अडकले आहेत. अशातच राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी १२वीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा निर्णय उच्च न्यायालयास कळविण्यात येणार आहे.

परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना परीक्षा घेऊन पाल्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. १०वीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.

याबाबत आधी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य (maharashtra) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय होईल आणि तो  उच्च न्यायालयास कळविला जाणार आहे. १२वीच्या परीक्षेबाबतचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पाठविण्यात आला आहे. त्यानुसार प्राधिकरण निर्णय घेईल. केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेत एकसूत्रता असावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली.


हेही वाचा -

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

CBSE १२वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत टळली


पुढील बातमी
इतर बातम्या