शिक्षण, रोजगार हक्कासाठी २१ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा

छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांसह विविध संघटनांतर्फे शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नावर गुरूवारी १५ नोव्हेंबरपासून लाँगमार्च काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात शासनाने मराठी शाळा बंद पाडल्या असून, आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद केल्या अाहेत. तसंच शिक्षकभरतीही बंद अाहे. याविरोधात येत्या २१ नोव्हेंबरला मंत्रालयावर हा लाँगमार्च धडकणार अाहे. 

हक्कासाठी मोर्चा 

शिक्षण व रोजगार हक्कासाठी हा लाँगमार्च काढण्यात येत असून शिक्षणमंत्र्यांनी मराठी शाळा जाणूनबुजून बंद पाडण्याचा घाट घातला आहे. मराठी शाळांमधील पटसंख्या कमी असल्याचं सांगत शिक्षणावरचा खर्च कमी करून तो वाचवल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. त्याशिवाय अनेक आदिवासी, गरजू यांसारख्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा नाकारण्यात येत आहेत. 

सरकारचा डाव 

इतकंच नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण संस्थातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद करण्यात आली आहे. परिणामी विषयाचं ज्ञान नसलेल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विषय शिकवले जात आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण-बाजारीकरण करुन सरकारी शिक्षण संपवण्याचा सरकारचा डाव असून शिक्षकांची लाखो पदे ‍रिक्त असताना देखील ती भरली जात नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे.  या  मोर्चामध्ये समाजवादी नेते बाबा आढाव, राष्ट्र सेवा दल अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार, शिक्षक आमदार कपिल पाटील यांसह महाराष्ट्रातील हजारो ग्रामीण, आदिवासी, व शिक्षणापासून वंचित विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या विविध भागातील अडीच लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. ही पदं गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्यानं लाखो विद्यार्थी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं लवकरात लवकर ही शिक्षक भरती सुरू करावी व आदिवासी विद्यार्थ्यांसाठीशैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी हा लाँगमार्च काढण्यात आला आहे.

 - सचिन बन्सोड, मुंबई अध्यक्ष, छात्रभारती


हेही वाचा - 

अतिरिक्त शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी

जेबीआयएमएसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरघोस पॅकेज


पुढील बातमी
इतर बातम्या