यंदापासून विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात एमटेक

गेल्या १० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात यंदापासून शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा विद्यापीठानं केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इथं 'एमटेक' या पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात होणार आहे. नुकतीच त्याबाबतची आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आंदोलनाला यश

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट, कलिना या मुख्य केंद्राबरोबरच ठाणे, कल्याण आणि रत्नागिरी अशी काही उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रातील कल्याण उपकेंद्र गेल्या कित्येक वर्षापासून बंद असल्यानं हे उपकेंद्र सुरू होण्यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं होतं. दरम्यानं अखेर कल्याण उपकेंद्र येत्या काही दिवसांत सुरू होणार असून विद्यार्थी संघटनेने केेलेल्या आंदोलनाला यश प्राप्त झालं आहे.

प्रवेश कधीपासून?

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून 'एमटेक इन कम्प्युटर इंजिनिअरिंग' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून याची प्रवेश क्षमता ३० निश्चित करण्यात आली आहे. तसंच यासाठीची प्रवेश प्रक्रिया २३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

पहिलं सत्र १८ सप्टेंबरपासून

एमटेक अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार असून त्या जागांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचं पहिलं सत्र १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.


हेही वाचा-

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं काम पूर्ण!

मुंबई विद्यापीठाचं मोबाइल अॅप सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या