पहिली ते चौथीच्या शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री म्हणाल्या...

राज्यात २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा सुरू होत असताना इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा कधी सुरू होतील? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. त्यावर सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी परवानगी दिल्यानंतर राज्यभरात बुधवार २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. शालेय शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाकडून  मुलांच्या स्वच्छतेची व सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी मला अपेक्षा आहे. 

कोरोना संसर्ग आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भलेही शाळा प्रत्यक्षात सुरू नसल्या, तरी आॅनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नियमित वर्ग आणि अभ्यास सुरळीत सुरू होता. परंतु आता कोरोनाचा संसर्ग (coronavirus) कमी होत असताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा आत्मविश्वास यावा, मनातली भीती दूर व्हावी म्हणून शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा- अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अनलॉक

त्याशिवाय इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग कधी सुरू होतील? असा प्रश्न विचारला असता आतापर्यंत परवानगी देण्यात आलेले वर्ग सुरळीतपणे सुरू झाले की त्याचा आढावा घेऊन आणि मुंबई (mumbai), पुण्यासहीत इतर स्थानिक पातळीवरील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन सरकारकडून निश्चितच इतर वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

याआधीच राज्य सरकारने ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील कोविडची स्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं.

सद्यस्थितीत ९ वी ते १२ वीचे २२,२०४ शाळांमधील २२ लाख विद्यार्थी नियमितपणे शाळेत जाऊ लागले आहेत. त्यात ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची भर पडल्यास हा आकडा ७८.४७ लाख विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे.

हेही वाचा- तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल
पुढील बातमी
इतर बातम्या