Advertisement

तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल

पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही? रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? तुमची तोंडं आता का शिवली आहेत ? असं सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.

तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल
SHARES

दिल्ली शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून हिंसाचार उसळलेला असताना जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही? रोज वचवच करणारे संजय राऊत (sanjay raut) देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? तुमची तोंडं आता का शिवली आहेत ? असं सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार (ashish shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला शेतकरी आंदोलकांच्या आडून हिंसाचार घडवून आणण्यात आला. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावं.

हेही वाचा- बदनामीने बेचैन होऊ नका, महाराष्ट्र पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

केंद्रीय कृषीमंत्री कित्येक दिवसांपासून नम्रपणे शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना त्यांची हेटाळणी केली जात आहे. २००३ पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली ते आज संयमाच्या चर्चेची गोष्ट करत आहेत. १७ वर्ष झाली कायदा आणून आणि चर्चा करुन तरीही तुम्हाला चर्चा करायची आहे. याचा अर्थ हे दुतोंडी हत्यार महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे. त्यामुळे शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) संयमाची भाषा करु नये. माथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नये. या आंदोलनाला ज्यांनी भडकवलं आणि ज्यांनी समर्थन दिलं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का ? आंदोलन आणखी चिघळायचं होतं का? माथी भडकावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? 

सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे, त्याचे समर्थक शरद पवार (sharad pawar) आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत, असं आशिष शेलार म्हणाले.

(bjp mla ashish shelar criticized sharad pawar and sanjay raut over farmers protest in delhi)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा