बोर्ड कुठलंही असो, मराठी भाषा शिकवणं सक्तीचं- मुख्यमंत्री

'राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे', अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

कठोर कारवाई

'सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या काही शाळा याचं पालन करत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं आहे. यासाठी कायद्यात बदल करुन अतिशय कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात मराठी शिकणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहिल. कुठल्याही बोर्डाच्या शाळांना मराठी शिकवावं लागेल, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

२४ जूनला आंदोलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

व्यासपीठाच्या मागण्या

  • इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सक्तीनं मराठी शिकवण्यासाठी तामिळनाडू आणि तेलंगणाच्या धर्तीवर मराठी शिक्षण कायदा आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा जूनच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणं.
  • मराठी शाळा बंद पडू नयेत आणि त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी मराठी शाळांचं गुणवत्तेच्या संदर्भात सक्षमीकरण करणं, त्याचा कृती आराखडा तयार करणे आणि भरीव आर्थिक तरतूद करणं.
  • मुंबईत मराठी भाषा भवन बांधणं किंवा शासन खरेदी करत अडलेल्या एअर इंडियाच्या जागेत ४ मजले देणं
  • शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणं.
  • शिक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी शाळांचा बृहद आराखडा अंमलात आणणे आणि त्या अंतर्गत सर्व मराठी शाळांना मंजुरी देणं.
  • मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांच्या भेटीला लेखकांचे शिष्टमंडळ नेणं.


हेही वाचा -

मुक्ता-ललितच्या जगण्याचा 'श्वास'

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?


पुढील बातमी
इतर बातम्या