एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी ) दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा आता पुढं ढकलण्यात आली आहे. ही परिक्षा ११ एप्रिलला होणार होती. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घेतली आहे. त्यामुळे पूर्व  परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी उपस्थित होते. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोन दिवसांनी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

याआधी १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला. यामुळे १४ मार्चची परीक्षा २१ मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतचं ११ एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं होईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलं होतं. 



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

पुढील बातमी
इतर बातम्या