आता एकवीस नाही, वीस एक म्हणा, बालभारतीच्या पुस्तकात अजब बदल

बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात अजब बदल करण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीनुसार गणित विषय शिकवताना शिक्षकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये बदललेल्या अभ्यासक्रमात शिक्षकांनी शिकवताना आता जोडाक्षर न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे बदल करण्यात आले आहेत. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते म्हणून हा बदल करण्यात आल्याचा दावा शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळं गणितातील संख्या वाचन सोपं झाले की कठीण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संख्यांचा उच्चार

गणिताच्या मराठी वाचनात यापुढे संख्या वाचन करताना २१ चा उच्चार एकवीस असा नाही, तर वीस एक असा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणं बावीसचा उच्चार वीस दोन, तेवीसचा उच्चार वीस तीन, चोवीसचा उच्चार वीस चार अशा रितीनं करण्यात आले आहेत. एकतीसचा उच्चार तीस एक, बत्तीसचा उच्चार तीस दोन अशा रितीनं बदल करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना ६१ या संख्येला एकसष्ट न म्हणता आता साठ एक असं उच्चारायचं आहे. ६२ या संख्येला बासष्ट न म्हणता साठ दोन म्हणतील इतरही उच्चारायचे आहे. ७१ चा उच्चार एकाहात्तर असा न करता सत्तर एक, ७२ चा उच्चार बहात्तर असा न करता सत्तर दोन असा करण्यात येणार आहे. ९३ त्र्याण्णव असा उच्चार न करता नव्वद तीन असा उच्चार केला जाणार आहे. १ ते १०० या ठिकाणी जिथे जोडाक्षर येतात तिथं ती संख्या नव्या पद्धतीनं वाचण्याची सूचना अभ्यास मंडळानं दिली आहे.

गणिताबाबत भीती

२१ ते ९९ या संख्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे. जोडाक्षर शिकवताना अनेक शब्द हे मुलांना गणिताबाबत भीती आणि नावड निर्माण करतात असं दिसून आलं आहे. त्यामुळे बालभारतीच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकण्यात येत आहेत. या पद्धतीमध्ये बोलणं आणि लिहणं हा क्रम सारखा राहतो. शिवाय विद्यार्थ्यांना संख्यावाचन सहज जमते.


हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि चर्नी रोड स्थानकातील पूल बंद

फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मंगळवारी विधिमंडळात होणार सादर


पुढील बातमी
इतर बातम्या