Advertisement

पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि चर्नी रोड स्थानकातील पूल बंद

चर्नी रोड स्थानकातील सैफी रुग्णालयाजवळचा पादचारी पूल पालिकेनं धोकादायक असल्याचं जाहीर करून तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि चर्नी रोड स्थानकातील पूल बंद
SHARES

पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड रेल्वे स्थानकातील गिरगावात जाण्यासाठी असलेला पादचारी पूल दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वी पाडण्यात आला असून त्याची दुरुस्ती धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळं चर्नी रोडच्या रहिवाशांसह इतर प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागतो आहे. अशातचं प्रवाशांच्या या त्रासात आणखी भर पडणार आहे. सैफी रुग्णालयाजवळचा पादचारी पूल पालिकेनं धोकादायक असल्याचं जाहीर करून तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, फलकही पुलाच्या जिन्याजवळ लावण्यात आला आहे. मात्र या फलकावर पूल कधी बंद होणार याचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे.

धोकादायक पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पादचारी पूलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पूलांचं स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आलं आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये जे पूल धोकादायक आढळलेले आहेत, ते पूल तातडीनं पाडण्यात येत आहेत. तसेच पूल विभागाकडून पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांना पत्र पाठवून धोकादायक पूल पाडण्याची शिफारस केली जात आहे.

पादचारी पूल

चर्नी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला साहित्य संघाजवळील पादचारी पूल तोडल्यानंतर आता सुमारे १५ वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल पाडण्यात येणार आहे. पालिकेच्या डी विभाग कार्यालयानं दोनच दिवसांपूर्वी नोटीस लावून पूल बंद करण्यात असल्याचं नमूद केलं आहे. मात्र, पूल नेमका कधी बंद करणार, प्रवाशांनी कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आलेला नाही. त्यामुळं फलकावरील पूल धोकादायक असल्याची सूचना वाचून या पूलावरून जाण्यास प्रवासी घाबरत आहेत.

जास्त प्रवासी

पूव बंद केल्यानं तसंच, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं अनेकजण जीव मुठीत धरून या पुलाचा वापर करत आहेत. या पुलावरून दररोज सुमारे २० हजारांपेक्षा अधिक प्रवाशी ये-जा करत असतात. त्यामुळं हा पूल पाडल्यास प्रवाशांची मोठी गैर सोय होण्याची शक्यता आहे.

नालासोपाऱ्यातील पूल बंद

चर्नी रोडसह नालासोपारा येथे नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्यानं जुना पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. गुरुवार २० जूनपासून हा पूल सार्वजनिक वापरासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी स्थानकातील उपलब्ध ४ पादचारी पुलांचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेनं केलं आहे.



हेही वाचा -

पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, कटऑफ नव्वदीपार

महापालिका बेस्टला देणार ६०० कोटी अनुदान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा