मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तसा आदेश काढला आहे. मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काळजी महापालिका घेत आहे.

२३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. शाळांबाबत राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच वेगळा आदेश काढला होता. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शाळा सुरु होणार असल्याने मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.


हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या